मराठवाडा भूकंपाने हादरला! विदर्भातील वाशीम, बुलढाण्यातही जाणवला धक्का

बुधवारी सकाळी 7.15 मिनिटांनी मराठवाडा भूकंपाने हादरला. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लागोपाठ दोन जोरदार धक्के बसल्याने लोक घाबरून रस्त्यावर आले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 4.5 एवढी झाली आहे. या भूकंपात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक ठिकाणी घरांना तडे गेले. या भूकंपाचा धक्का थेट विदर्भातील वाशीम, बुलढाण्यापर्यंत जाणवला.

नांदेड, हिंगोली या दोन जिल्ह्यांना गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे छोटे छोटे धक्के बसत आहेत. मात्र २१ मार्च रोजी ४.५ रिश्टर स्केलचा मोठा हादरला बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथे होता. आज सकाळी ७.१५ मिनिटांनी अचानक जमिनीतून मोठा गडगडाट झाला. त्यापाठोपाठ जमीन काही क्षणांसाठी हादरली. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या धक्क्याची तीव्रता दूरदूरपर्यंत जाणवली. पहिला हादरा बसल्यानंतर लगेच काही क्षणात दुसरा धक्का बसला. भूकंपाचा धक्का जाणवला तेव्हा मराठवाडा साखरझोपेतून नुकताच जागा होत होता. पहिल्या धक्क्याने घरांवरील पत्रे वाजली. स्वयंपाक घरातील भांडीकुंडी एकमेकांवर आदळली. काही घरांना तडे गेले. लोक घाबरून रस्त्यावर पळाले नाही तोच दुसरा हादरा बसला.

हिंगोलीसह कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव परिसर १० सेकंद हादरला. भूकंपाचा धक्का जाणवताच माळधामनी गावातील लोकांनी घराबाहेर धाव घेतली. कळमनुरी जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. घराच्या पत्र्यांवर आधारासाठी ठेवण्यात आलेले दगड, मोठमोठी लाकडे काढून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले. भूकंपाच्या धक्क्याने निमटोक गावात अनेक घरांना तडे गेले आहेत. पेटवडगाव येथे देवीच्या मंदिराच्या शिखराचा काही भाग कोसळला तर बुरुजही ढासळला.

नांदेड शहर तसेच जिल्ह्यात सकाळी सव्वासात वाजता भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के बसले. दत्तनगर, तरोडा, श्रीनगर, वर्कशॉप, कौठा, सिडको, हडको, विष्णुपुरी या भागात भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरून रस्त्यावर आले. अनेक तालुक्यांमध्येही भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा धक्का जाणवताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भूकंप संशोधन केंद्रालाही अहवाल देण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. चिकलठाणा, मुकुंदवाडी, रामनगर, गारखेडा, सिडको, हडको, देवळाई, सातारा, वीटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, बेगमपुरा, विद्यापीठ, रेल्वेस्थानक, रोशनगेट, शिवाजीनगर आदी भागांत काही सेकंद जमीन हलली.

जालना जिल्ह्यात अंबड, घनसांवगी, मंठा, परतूर तालुक्यात सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि घनसांवंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांनी यास दुजोरा दिला. तीर्थपुरी, बाणेगाव, मुरमा, खालापुरी, श्रीपत धामणगाव, राजा टाकळी, राजेगाव, मांदळा, लिंबोणी, राम गव्हाण, हसनापूर, रांजणी, रोहिला गड, भणंग जळगाव, एकलहेरा, शेवगा, आलमगाव, मठपिंपळगाव आदी परिसरात भूकंपाचा धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

विदर्भातील वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत या भूकंपाचा हादरा बसला. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागालाही हादरा जाणवला. वाशीम तालुक्यातील ब्रह्मा, अनसे, जांभरूण, राजगाव, सारखेडा, उकळी, पेंड या ठिकाणी भूकंपाचा धक्का बसताच लोक घाबरून रस्त्यावर आले. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक गावांमध्ये भूकंपाचा धक्का बसल्याने पळापळ झाली.

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे बुधवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांपर्यंत या भूकंपाचा हादरा जाणवला.
– श्रीनिवास औंधकर, एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक