मराठमोळी लोककला

775

गणेश चंदनशिवे

महाराष्ट्र संत, तंत आणि पंतांची भूमी आहे. येथे प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा बदलतो. इथले सण, उत्सव, जत्रा, महोत्सव हेसुद्धा बदलताना दिसतात. लौकिक अर्थाने महाराष्ट्राचे पाच प्रांत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाडा. भाषा जरी मराठी असली तरी या प्रांतातील भौगोलिक परिस्थितीचा, वातावरणाचा प्रभाव आणि परिणाम त्या भाषेवर आपणास दिसतो. प्राचीन काळापासून संस्कृत प्राकृत भाषा काळानुसार बोलली जायची. संस्कृत भाषेवर विशिष्ट अशा वर्गाची अधिकारवाणीने बोलण्याची मत्तेदारी होती. पुढे चक्रधरस्वामींपासून महानुभाव पंथाची परंपरा सुरू झाली आणि सर्वसामान्य बहुजन समाजाला समजेल अशा भाषेत धर्मगंथाची शिकवण संतप्रभावळ करू लागली. संताच्या अभंग, भारुड, गवळणी, साकी यांमधून समाजाचे प्रबोधन होऊ लागले.

समाजात वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्रीपुरुष भिन्नता इ. प्रकारची दुफळी मोडून काढण्यासाठी संतांनी आपल्या रचनांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या मराठी मुलुखावर अनेक स्थित्यंतरे आली आणि गेली. अनेकांनी मराठी भूमीवर आणि मराठी मुलखावर अतिक्रमण केले. त्यांनी आपले बरेवाईट संस्कार या भूमीवर सोडले. तरी मराठी भाषा आणि मराठी माणूस यांनी आपल्या मातीचा संस्कार मात्र ढळू दिला नाही. मराठी भाषा जशी वळवली तशी वळते. या म्हणी आणि उक्तीप्रमाणे संतांबरोबरच लोककलावंत आणि समाजसुधारकानीं ही भाषा जपण्याचं काम प्रामुख्याने केले आहे.

लोककलावंतानी मराठमोळ्या भाषेबरोबरच आपल्या लोककलेचा प्रसार आणि प्रचार केला. गोंधळ, भारुड, पोवाडा, दशावतार, तमाशा यांच्या सादरीकरणात रांगडेपणा दिसून येतो. या रांगडेपणातूनच रात्रभर गायल्या जाणाऱ्या रचना पुढे पुढे प्रयोगशील होत गेल्या. गीत, नृत्य, नाट्याच्या अंगाने त्या सादर होऊ लागल्या. अनेक शाहीर मराठी भाषेच्या जोरावर प्रतिभासंपन्न होऊ लागले. शाहिरी परंपरा ही अगीनदास, अज्ञानदासांपासून कवी नागेशपर्यंत वीरांचे गुणगान करणारी कवने करू लागला. पुढे पेशवाईच्या काळात काही ब्राह्मण शाहीरांना राजाश्रय मिळाला. शाहीर प्रभाकर, राम जोशी, अनंत फंदी यांच्या कवनातून आणि फटक्याच्या माध्यमाने शृंगारिकतेबरोबर अध्यात्म, भेदिक लोकापर्यंत सरळसाध्या मराठी भाषेत पोचू लागले. पेशवाईच्या बाहेर, गावगाड्यात शाहीर परशुराम, सगन भाऊ, भवानी तेली, हे तमाशा कलावंत शाहीर लोकांच्या प्रबोधन, उद्बोधनांबरोबरच अस्सल रांगड्या मराठी भाषेत रंजनाबरोबर लोकशिक्षणही देऊ लागल्या. त्याकाळी खऱ्या अर्थाने मराठी भाषा जपण्याचे काम या लोककलावंतानी केले. उमामांग, सावळंजकर, सातूहिरु कौलापूरकर, हैबती गाडगे, पुसे सावळेकर, शाहीर पट्टेबापूराव, शाहीर भाऊ फक्कड ऊर्फ भाऊ मालोजी भंडारे, दत्तोबा तांबे, भाऊ बापू मांग, नारायण गावकर हे आणि असे कित्येक तमाशा कलावंत मराठी भाषेचे सत्त्व आणि स्वत्व जपण्याचे काम करू लागले.

लोककलावंताबरोबरच, लोकसाहित्यिक, ग्रामीण साहित्याचे अभ्यासक, मराठी बोली आणि भाषेचे संशोधक यांचे साहित्यसुद्धा वाखाणण्याजोगे आहे. दुर्गा भागवत, गंगाधर मोरजे, डॉ. प्रभाकर मांडे, सरोजिनी बाबर, डॉ. रा. चिं. ढेरे इ. लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी मराठी लोकसंस्कृती लोकपरंपरा, लोकोत्सव, लोकदेवता या विषयी चिकित्सक संशोधन करून मराठी भाषेला एक वेगळा आयाम दिला.

१५ ऑगस्ट १९४७ ला हिंदुस्थान स्वंतत्र झाला. अनेक संस्थाने खालसा करण्यात आली. मात्र मराठी भाषेच्या संरक्षणासाठी कलावंताना आणि नेत्यांना पुढे लढा द्यावा लागला. आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट यांनी मुंबईसह महाराष्ट्र पुढे मराठी एकभाषिक राज्य झाले पाहिजे यासाठी लढा सुरू झाला. शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, चंदू भराडकर, शाहीर लीलाधर हेगडे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एल्गार उभा केला.

कारवार, डांग, उंबरगाव, भालकी ही कानडी सीमेलगतची गावे मराठी मुलुखात यावी म्हणून शाहीरांनी हातात डफ उचलला. मराठी भाषेच्या संवधर्नासाठी शाहिरी गर्जना करत शाहीर मंडळी महाराष्ट्रातल्या गावोगावी फिरू लागली. अण्णाभाऊंप्रमाणेच शाहीर आत्माराम पाटील आपल्या रचनेत मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लिहितात आणि व्यक्त होतात की, संयुक्त महाराष्ट्र लढय़ाची पेरणा व धारणा होती आपली मातृभाषा मराठी. ते म्हणतात, मुंबईसहित मराठीयांचे महाराष्ट्र राज्य झाले पाहिजे हा आपल्या जन्मसिद्ध हक्काचा न्याय्य लढा आहे. म्हणून मराठी मातृभाषेची अनन्यसाधारण असणारी थोरवी महाराष्ट्र राज्य व जगाला दर्शवण्यासाठी माझ्या शाहिरी अस्मितेने ”महन्मंगले” हे मराठी माऊलीचे भजन काव्य रचले आहे.

महन्मंगले माऊली गे मराठी।।

तुझ्या गुंजनाचा जडो छंद कंठी।।

महाज्ञान मेरू तुझा ज्ञानराया।।

तुका भावसिंधु भवाला तराया।।

जगी ज्ञानगंगा प्रवाहे मराठी।।

फोडीलीस कास तूच संस्कृताची।।

अशा ज्वलंत लेखणीतून आत्माराम पाटील संयुक्त महाराष्ट्राच्या न्याय्य हक्कांची मागणी करत होते. डमडमसारख्या राक्षसी दमनशक्तीने मराठी भाषिक लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. शाहीर आत्माराम पाटील यांनी डमडम भ्रम मोडीत काढून महाराष्ट्रविरोधकांना मराठ्यांची जिद्द समजावी म्हणून काही ओळी रचलेल्या आहेत. मरहट्टी म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषा बोलतो, तिची अस्मिता जाणतो असा जो मरणाला न हटणारा तो मरहट्टी, म्हणजेच मराठी होय!

ज्वलंत लेखणी आणि प्रतिभेच्या जोरावर मायमराठी भाषेसाठी आत्माराम पाटलांसमेवतच जैनूशेख चांद, शाहीर नामदेव कापडे, चंदु भराडकर महाराष्ट्राची गाणी गाऊ लागले.

पुढे शाहिरांच्या आणि कम्युनिस्ट नेत्यांच्या कार्याला बळ आलं आणि पुढे मराठी अस्मितेच मराठी एक भाषिक महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबईचा भौगोलिक विस्तार झाला. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून अनेक व्यवसाय सुरू झाले. कष्टकरी, कामगार, गुण्या गोविंदाने नांदू लागले. परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रात अणि मुंबई स्थिरावत गेले. पण इथल्या कलावंतानी आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला सोडले नाही. महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे शाहीर विठ्ठल उमप, शाहीर कृष्णकांत जाधव, शाहीर बापूसाहेब विभूते, शाहीर बाबासाहेब देशमुख, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, कृष्णा शिंदे या आणि अशा गावगाड्यातील, खेद्यापाड्यातील प्रतिभावंत शाहिरांनी आपल्या रचना आणि कवनांच्या माध्यमातून मराठी संस्कृती आणि भाषा जिवापाड जपली. जेव्हा जेव्हा मराठी भूमीवर स्थित्यंतरे आली तेव्हा तेव्हा लोककलावंत आणि शाहीर मंडळीनी हातामध्ये डफ, तुणतुणे घेऊन लोकांच्या मनोरंजनाबरोबर लोकांचे प्रबोधनही केले.

शाहिरांची खदखद ही त्यांच्या काव्यातून आज आपल्या समोर आहे. जागतिकरणाच्या युगात पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणाने आणि अनुकरणाने मराठी भाषेचे तुकडे होतात की, काय अशी एक भीती आजच्या काळात भेडसावत आहे. मराठी भाषेची अस्मिता तिचे अस्तित्व आणि तिचा गोडवा जपण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना पुढे येणे गरजेचे आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या