तहसिल कार्यालयासमोर पोतराजासह आंदोलन

53

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

वीजपुरवठा व दलितांना मिळणाऱ्या शासनाच्या निरनिराळ्या योजनांचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी अखेर टाकळी लोणार शिवारात राहणाऱ्या वस्तीतील नागरिकांनी ढोल-ताशा व पोतराजासह तहसील कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने धरणे आंदोलन केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार शिवारात सुमारे दीडशे लोकसंख्या असलेली दलित वस्ती व आदिवासी वस्ती आहे. ही वस्ती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अंधारात आहे. पाच वर्षांपूर्वी वादळात विजेचे खांब पडले; मात्र अद्यापही त्यांची दुरुस्ती न करण्यात आल्याने या समाजाला अंधारात आपले जीवन जगावे लागत आहे. या वस्तीत रोहित्र व विजेचे खांब उभे केलेले असूनही वीजपुरवठा खंडित आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याची व्यथा त्यांनी आंदोलन करून मांडली आहे. त्याचबरोबर दलित समाजाच्या वस्तीला मिळणाऱ्या शासनाच्या निरनिराळ्या योजनांपासून देखील ही वस्ती दूर आहे. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले.

आपली प्रतिक्रिया द्या