
महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम जनतेचे आराध्य दैवत. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यापासून छत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्या रायगड किल्ल्यापर्यंत शिवरायांच्या दौलतीत असलेले 365 किल्ले म्हणजे संघर्षाची प्रतीकेच. हे गडकोट किल्ले आणि दुर्ग आपल्या इतिहासाची आणि शौर्याची सोनेरी पाने आहेत. या गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कोल्हापुरातील तरुण हर्षल सुर्वे या तरुणाने पुढाकार घेतला आहे.
किल्ल्यांची विटंबना करणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यासाठी हर्षल याने पन्हाळगडावर चित्रित केलेला ‘भावा मर्दासारखा वाग जरा..’ हा व्हिडीओ अवघ्या महाराष्ट्रात तुफान व्हायरल झाला आहे. यु ट्यूबवरील या व्हिडीओला जोरदार लाईक्स मिळाले आहेत. किल्ल्यावर डौलाने फडकणारा भगवा झेंडा, त्यापाठोपाठ डफ, तुणतुणे, ढोल आणि हलगीचा कडकडाट सुरू असतानाच वाक्य घुमते..
भावा मर्दासारखा वाग जरा
गड माझ्या राजाचा..
मराठ्याच्या सर्जाचा..
मातीसाठी झटलेल्या मर्दवीर मावळ्यांचा..
गडाच्या या चिऱ्यांमध्ये मावळ्यांचं रक्त..
जीवाचा गुलाल राजासाठी फक्त..
गडावर फक्त मौजमस्ती करण्यासाठी जाणारे मित्रमैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी यांना गडाच्या पायथ्याशीच पारंपरिक वेषभूषा केलेले मावळे अडवतात. गडावर तुमचे स्वागत आहे; पण या पवित्र वास्तूचे भान राखा.. हे हिंदवी स्वराज्याचे बालेकिल्ले आहेत. रोमॅण्टिक स्पॉट नाहीत असे त्यांना ठणकावून सांगितले जाते आणि हे सांगताना सूत्रधाराच्या भूमिकेत असलेले शिवसैनिक हर्षल सुर्वे डफाच्या घुमणाऱ्या तालावर राजाच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची महती सांगतात. सवाचार मिनिटांच्या या व्हिडीओममध्ये हर्षल आणि त्याच्या टीमने अख्खा शिवकाळ उभा केला आहे.
गडावरील चि-यांवर कोरलेली प्रियकर, प्रेयसींची नावे, दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे गोळा करून गडकिल्ला स्वच्छ करताना हे मावळे गडावर येऊन कल्ला करणा-यांचे कानही पकडतात.
शाहिस्त्याचं बोट आठव,
अफझल्याचं पोट
टकमक टोक नाही तर
लिंगाण्याचा कोट
जिरवणार मस्ती
उडवणार सुस्ती
वाकड्यात जाईल
त्याला आपलीच धास्ती
असेही ठणकावण्यास हे मावळे कमी करत नाहीत. पन्हाळ्याची माती कपाळाला लावून तुतारीच्या निनादात हर्षल सुर्वे आणि त्यांच्या टीमने गडकिल्ले संरक्षणाची घेतलेली शपथ रोमांच उभी करते. या व्हिडीओची संकल्पना युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षल सुर्वे यांचीच असून आमदार ऋतुराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवून अंत्यसंस्कार
कोरोनाच्या महासंकटात आप्तस्वकीयांचे निधन झाल्यावर त्याचे अंत्यसंस्कार करताना नातेवाईक घाबरत असत. अशावेळी हाडाचे शिवसैनिक असलेल्या हर्षल सुर्वे यांनी त्यांचे सहकारी चैतन्य अष्टेकर यांच्या मदतीने ही जबाबदारी स्वीकारली. कोरोनाने मृत्यू झालेल्या शेकडो रुग्णांचे मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवून त्यांच्यावर स्वत: अंत्यसंस्कार करत त्यांनी आपली माणुसकी दाखवून दिली.