मार्लेश्वर देवस्थानच्या मूळ दुर्लक्षीत स्थानाची साफसफाई

सामना ऑनलाईन । देवरुख

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर हे देवस्थान महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . वर्षाला लाखो यात्रेकरु आणि पर्यटक या ठिकाणी येत असतात . पर्यटनाच्या माध्यमातून मार्लेश्वर देवस्थान परिसराचा विकास झाला असला तरी , मार्लेश्वरचे देवरुख नजिक असलेले मूळ स्थान दुर्लक्षीत असल्याचं वृत्त दैनिक सामनाने प्रसिध्द करताच देवरुख येथील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या चाळीस सदस्यांनी मार्लेश्वरच्या मूळ स्थानाची साफसफाई करुन यात्रेपूर्वी परिसर स्वच्छ केला आहे . एवढेच नव्हे तर, या क्रिकेट क्लबच्या वतीने उन , वारा आणि पावसात असणाऱ्या या देवस्थानच्या ठिकाणी कायमस्वरूपी शेड आणि लादी बसविण्यात येणार आहे . दैनिक सामनाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करुन लक्ष वेधल्याबद्दल देवरुख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी सामनाला धन्यवाद दिले आहेत .

सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारे मार्लेश्वर देवस्थान पुर्वी देवरुख नजिक होते . मार्लेश्वरच्या मूळ ठिकाणाहून देव सह्याद्री पर्वतरांगांमधील गुहेत गेल्यानंतर मूळ स्थान दुर्लक्षीत झाले . स्थानिकांशिवाय या स्थानाकडे कोणी फीरकेनासं झालं . दर वर्षी जानेवारी महिन्यात मार्लेश्वर यात्रा आली की , मार्लेश्वर मूळ स्थानाबाबत आठवण केली जात असे , मात्र परत वर्षभर कोणतीही हालचाल होत नसे . अखेरीस काही दिवसांपूर्वी सामनाने छायाचित्रासह याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिध्द केल्यानंतर देवरुख येथील मॉर्निंग क्रिकेट क्लबने या वृत्ताची दखल घेतली आणि आपल्या चाळीस सदस्यांना घेऊन मूळ देवस्थान परिसरात वाढलेली झुडपे , गवत , पालापाचोळा बाजूला करुन सर्व परिसर स्वच्छ सुंदर बनविला .

देवरुख येथील मॉर्निंग क्रिकेट क्लब मध्ये एकूण ६० सदस्य असून या क्लबची १२ खेळाडूंचा उत्तम क्रिकेट संघ आहे . या क्लबचे खेळाडू पावसाळी हंगाम सोडला तर अन्यवेळी दररोज सकाळच्या वेळात क्रिकेटचा सराव करतात . खेळाबरोबरच पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधणे , स्वच्छता करणे , वनभोजन आदि सामाजिक उपक्रमही राबवत असतात . क्लब मधील सर्व ६० सददस्यांना गणवेश देण्यात आला असून यावर्षी क्लबने युयुत्सू आर्ते , संतोष लाड , अनिल कुडाळकर , वैभव आंबवकर , सत्यम नारकर , सी . एस . जाधव , विशाल तळेकर , रुपेश पावस्कर आदी सदस्यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्याने देवरुख जवळील मार्लेश्वरच्या मूळ स्थानाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला . सकाळच्यावेळी जवळपास ४० सदस्य एकत्र आले आणि सर्वांनी मिळून अथक श्रमदान करत मार्लेश्वर मूळ देवस्थान परिसराची साफसफाई करुन या परिसराला उर्जितावस्था आणली .

मार्लेश्वर मूळ देवस्थानची केवळ स्वच्छता करुन ही मंडळी स्वस्थ बसली नाहीत तर , या ठिकाणी देवस्थान उन , वारा , पावसात असल्याने येथे एक कायमस्वरूपी पत्र्याची शेड आणि लादी बसविण्याचा निर्णयही घेतला . लोकसहभागातून हे काम आम्ही पुर्णत्वास नेणार असल्याचे युयुत्सू आर्ते यांनी सामना प्रतिनिधीला सांगितले . दरम्यान हा परिसर देखिल एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावा यासाठी मॉर्निंग क्रिकेट क्लब प्रयत्नशील राहील असे क्लबचे सदस्य संतोष लाड यांनी सांगितले . गेली अनेक वर्षे दुर्लक्षीत असलेले हे स्थान आत नावारूपाला येइल , यासाठी वृत्त प्रसिध्द करुन लक्ष वेधल्याबद्दल मॉर्निंग क्रिकेट क्लबने दैनिक सामनाला धन्यवाद दिले आहेत .