मार्मिकचा हीरक महोत्सवी वर्धापन दिन; नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत पार पडणार जल्लोषपूर्ण सोहळा

1207

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावरील अन्यायाला ‘मार्मिक’मधून वाचा फोडली. कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून तत्कालीन सरकारी व्यवस्थेला अक्षरश: जेरीस आणले. एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून गौरविले जाणाऱ्या ‘मार्मिक’चा हीरक महोत्सवी वर्धापन दिन उद्या १३ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळून अनोख्या पद्धतीने हा सोहळा साजरा होणार आहे. गीत, पोवाडे, प्रहसन अशा विविधरंगी कार्यक्रमात, नामवंत कलाकारांच्या सहभागात हा सोहळा पार पडणार असून ‘मार्मिक’च्या हीरक महोत्सवानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिक, ‘मार्मिक’प्रेमी तसेच तमाम मराठी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. हा जल्लोषपूर्ण सोहळा सायंकाळी 6 वाजता यू-ट्यूबवर लाइव्ह अनुभवता येणार आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या लेखणीने अजरामर झालेल्या ‘मार्मिक’ साप्ताहिकाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. व्यंगचित्रांनी इतिहास घडवणाऱ्या ‘मार्मिक’चा हीरक महोत्सवही त्याच दिमाखात साजरा होणार आहे. यंदा कोरोनामुळे या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसले तरी यू ट्यूबवर याचि देही याचि डोळा हा सोहळा अनुभवता येणार आहे. सायंकाळी ६ वाजता https://www.youtube.com/c/ShivSenaofficial/ या संकेतस्थळावर हा सोहळा पाहता येणार आहे. लेखक श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित या सोहळ्यात विशाखा सुभेदार, समीर चौघुले, नंदेश उमप, आनंदी जोशी, मुलाखतकार सुधीर गाडगीळ, कवी रामदास फुटाणे हे दिग्गज कलाकार रंगत आणणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कNहाडे करणार आहे. या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन. मार्मिकच्या हीरक महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री काय मार्गदर्शन करतात याबाबत शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या