मराठी माणसावर अन्याय कराल तर खबरदार! गाठ शिवसेनेशी आहे!!

2781

‘शिवसेना’, ‘सामना’ यांचा जन्मदाता ‘मार्मिक’ आहे ‘मार्मिक’ने थंडावलेली मनं आणि मनगटात आत्मविश्वास जागवला. मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांना खणखणीतपणे सांगितलं की, याद राखा, जर महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय कराल तर गाठ शिवसेनेशी आहे. त्यातून हा धगधगता 60 वर्षांचा कालखंड आपल्या साक्षीने पूर्ण झाला. ही वाटचाल आता पुढे सुरू आहे. अन्याय करण्याची आता कुणाची हिंमत नाही. पण आजसुद्धा जर कोणी मराठी माणसावर, भूमिपुत्रावर अन्याय करण्याचा प्रयत्न जरी केला तर गाठ शिवसेनेशी आहे, ‘मार्मिक’शी आणि ‘सामना’शी आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठणकावले.

‘मार्मिक’चा हीरक महोत्सवी सोहळा यू-ट्यूबवर गुरुवारी त्याच जल्लोषात ऑनलाइन साजरा झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक, ‘मार्मिक’प्रेमी आणि तमाम मराठी बांधवांना मार्गदर्शन केले. मराठी माणसाच्या मनगटात आत्मविश्वास निर्माण करणाऱया ‘मार्मिक’चा 60 वर्षांचा कालखंडच त्यांनी समोर उभा केला. उद्धव ठाकरे म्हणाले, सामर्थ्य शस्त्र्ाात असतं, सामर्थ्य बंदुकीत, तोफात असतं, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे सामर्थ्य दाखवलं ते (पान 1 वरून) कुंचल्याच्या फटकाऱयाचे सामर्थ्य होते. सुरुवातीला ‘मार्मिक’ची स्थापना झाली त्याच्यामागे भावना होती ती लढा देऊन मुंबई मिळवणाऱया मराठी माणसाचं मनोरंजन करण्याची. मराठी माणसाच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा हवा म्हणून ‘मार्मिक’चं प्रकाशन करण्यात आलं. पण मराठी माणसाने मिळवलेल्या मुंबईतच परप्रांतीय आपल्या छाताडावर बसताहेत, हैदोस घालताहेत, मग अशा वेळी गप्प बसणं शक्यच नव्हतं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात अग्रणी असणाऱया प्रबोधनकारांचे कुटुंब गप्प बसणे शक्यच नव्हते आणि मग मनोरंजनासाठी निर्माण झालेल्या ‘मार्मिक’मधून मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडायला सुरुवात झाली.

आजही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पूर्ण झालेली नाही!

‘मार्मिक’चा जन्म का झाला याचा मागोवा आपल्यासमोर मांडला गेला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळही त्या वेळी पूर्ण झाली नव्हती. तशी ती आजही पूर्ण झालेली नाही. बेळगाव, कारवार, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आजही आपल्यात आलेला नाही, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

लढायचं ते अन्यायावर वार करण्यासाठी!

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून नुकतीच मुंबई महाराष्ट्राने मिळवली होती. ज्या 107 हुतात्म्यांचा उल्लेख केला जातो त्याबाबतही शिवसेनाप्रमुखांनी एक संदर्भ दिलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अत्युच्च शिखरावर असताना एका परदेशी महिला पत्रकाराने जे चित्र पहिलं ते लिहिलं आहे. त्या म्हणतात की, त्यांच्यासमोर 200 ते 250 मृतदेह पडलेले होते. हा अत्याचार मराठी माणसाने भोगला, सोसला. तरीसुद्धा मराठी माणसाने अत्याचार करणाऱयांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या छाताडावर भगवा झेंडा रोवला. ही या मराठी माणसाची ओळख आहे. मराठी माणसं कोणावर अन्याय करणार नाहीत. पण जो अन्याय करेल त्याला शिल्लक ठेवणार नाही. लढायचं ते अन्यायावर वार करण्यासाठी, दीनदुबळे, माता-भगिनींच्या रक्षणासाठी लढायचं. तीच शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.

कविता, पोवाडय़ांनी जागवला महाराष्ट्राचा इतिहास

‘मार्मिक’च्या हीरक महोत्सवी कार्यक्रमात मराठीची अस्मिता आणि मराठी बाणा काय असतो याची झलकच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. महाराष्ट्रात राहायचं तर इथल्या भाषेचा सन्मान झालाच पाहिजे. मुंबईत राहायचे तर मराठी आलीच पाहिजे, असे ठणकावून सांगणारे समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांनी सादर केलेले प्रहसन प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेले. नंदेश उमप यांनी पोवाडे व गीतांतून छत्रपती शिवरायांपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ापर्यंतचा इतिहास जागवला. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी ‘सलून’ कवितेतून कोरोनाच्या स्थितीवर भाष्य केले. या वेळी रामदास फुटाणे तसेच मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी शिवसेनाप्रमुखांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र, ‘मार्मिक’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 60 वर्षं पूर्ण होण्याचा अपूर्व त्रिवेणी योग जुळून आल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकर्षण कऱहाडे यांनी केले तर आनंदी जोशी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लढा सुरूच राहणार!

भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याचा कायदा आपल्या सरकारने केला. शिक्षणात व व्यवहारात मराठी भाषा अनिवार्य केली. अनेक गोष्टी आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर केल्या आहेत. काही गोष्टींचा वेग मंदावला. त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे… कोरोना. काही करायला गेलो की करो ना! ‘मार्मिक’चं हे कार्य, शिवसेनेचं हे कार्य आपल्या साथीने, सोबतीने सुरूच राहणार. अन्यायाविरोधात गरज लागेल तेव्हा लढा सुरूच राहणार, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला दिला.

‘मार्मिक’सुद्धा डिजिटल रूपात

या वेळी ‘मार्मिक’ डिजिटल रूपात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, ‘सामना’ सर्वांशीच सुरू आहे. वृत्तपत्रसुद्धा सुरू आहे आणि अन्यायाविरोधात सुद्धा ‘सामना’ सुरू आहे. हे ऑनलाइनचं युग आहे. ‘मार्मिक’सुद्धा लवकरच डिजिटल रूपात ऑनलाइन भेटीला येणार आहे. मात्र राजकीय भाष्य करणारे व्यंगचित्रकार कमी झाले अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. असे व्यंगचित्रकार आपल्याला हवे आहेत. त्यांच्या सोबतीने हे व्रत असेच अविरत सुरू राहील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या