प्रेयसीला भेटायला आलेल्या विवाहित प्रियकराला ग्रामस्थांनी चोपले

2409

लॉकडाऊन असताना प्रेयसीला भेटायला जाणं एका प्रियकराच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेत ग्रामस्थांनी प्रियकराला चांगलाच चोप दिला आहे. या तरुण विवाहित असल्याची माहितीही मिळत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थ नगर येथे ही घटना घडली आहे. अब्दुल कादिर असं या तरुणाचं नाव आहे. तो परसाजमाल गावचा रहिवासी आहे. विवाहित असूनही त्याचे जंगलीपूर इथल्या एका तरुणीशी विवाहबाह्य संबंध होते. लॉकडाऊनच्या काळातही तो तिला भेटायला येत होता. 26 मे रोजी तो तिच्यासोबत गावाबाहेरील बागेत बसला होता. या प्रकरणाची कुणकुण जंगलीपूर गावच्या काही तरुणांना लागली. ते त्या बागेत जाऊन पोहोचले.

बागेत तरुणांना येताना बघून तरुणी पळून गेली. पण, त्यांनी अब्दुल याला पकडलं आणि त्याला मारायला सुरुवात केली. थपडा, लाठ्यांसह तरुणाला मारहाण करून झाल्यानंतर त्यांनी त्याचं मुंडन केलं आणि कपडे फाडून गावभर धिंड काढली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या