भलत्याच माणसाच्या घरात उठला विवस्त्र माणूस, उठल्यावर कळालं की वाट लागलीय

लंडनमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एक विवाहीत माणूस सकाळी उठला तेव्हा त्याला कळालं की तो त्याच्या घरात नाहीये. त्याच्या घरापासून बऱ्याच लांब अंतरावर असलेल्या एका अनोळखी घरात त्याचे डोळे उघडले होते. या धक्क्यातून सावरायच्या आत त्याला कळालं की त्याच्या अंगावर एकही कपडा नाहीये. तो या घरात कसा आला, त्याचे कपडे कुठे गेले नेमकं काय झालं हे त्याला आठवतच नव्हतं. आदल्या रात्री आपण लंडनमधल्या चेल्सी भागातल्या एका नाईटक्लबमध्ये गेलो होतो एवढंच त्या माणसाला आठवत होतं. झोपेतून उठल्यानंतर त्याला समोर एक माणूस उभा असल्याचं दिसलं ज्यामुळे हा विवाहीत माणूस अजून गोंधळला होता.

आदल्या रात्री पार्टीसाठी आपण गेलो असताना भलत्याच माणसाच्या घरात कसे काय पोचलो? असा या विवाहीत माणसाला प्रश्न पडला होता. पडद्याच्या आडून चंदेरी प्रकाश झिरपत असल्याचंच त्याला फक्त आठवत होतं. बरंच आठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला आपल्या ओठाशी कोणीतरी चॉकलेटी रंगाच्या द्रव्याचा कप लावत असल्याचा भास झाल्याचंही त्याला आठवलं. झोपेतून उठल्यानंतर त्याला समोर जो माणूस दिसला तो युरोपिअन पद्धतीचं इंग्रजी बोलत होता. या माणसाचं नाव लुईझ डीसिल्व्हा असल्याचं नंतर उघडकीस आलं. लुईझने त्या विवाहीत माणसाला सांगितलं की तुला घरी नेण्यासाठी टॅक्सी बोलावलीय आणि ते येतेच आहे. हे ऐकल्यानंतर विवाहीत माणसाने आपले कपडे गोळा केले आणि आपण अजिबात तणावाखाली नसल्याचं दाखवत घरी जाण्यासाठी तयारी केली. लुईझ त्याच्याशी प्रेमाने बोलत होता, दमदाटीची भाषा लुईझने अजिबात वापरली नव्हती, ज्यामुळे विवाहीत माणूस आणखीनच बुचकळ्यात पडला होता.

टॅक्सी येताच विवाहीत माणसाने लुईझच्या घरातून धूम ठोकली. टॅक्सीत बसल्यानंतर त्याने वारंवार त्याचं लोकेशन पाहिलं तेव्हा त्याला कळालं की तो ऑक्सफोर्डशायर भागात होता. ही जागा त्याच्या घरापासून बरीच लांब होती. फोन उघडताच या माणसाला त्याच्या बायकोचे, मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे मेसेज दिसले. हा विवाहीत माणूस अचानक गायब झाल्याने ते सगळे चिंतेत पडले होते.

विवाहीत माणसाने हा सगळा प्रकार पोलिसांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी चौकशीला सुरुवात केली. धक्क्यातून सावरल्यानंतर विवाहीत माणसाला काही घटना आठवल्या ज्या त्याने पोलिसांना सांगितल्या. तो त्याच्या मित्रांसोबत एका पबमध्ये गेला होता. 4-5 बिअर ढोसल्यानंतर तो मित्रांसोबत जेवला होता. यानंतर तो आणि त्याचे मित्र राफेल्स नावाच्या नाईट क्लबमध्ये गेले होते. तिथेही सगळ्यांनी दारू प्यायली होती. या विवाहीत पुरुषाचे मित्र एक-एक करुन घरी निघून गेले. इकडे हा विवाहीत पुरुष दारुने झिंगला होता. त्याला बोलताच येत नव्हतं.

पोलिसांनी लुईझची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की त्याने या विवाहीत पुरुषाशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते. पोलिसांनी त्याच्यावर आरोप ठेवला आहे की त्याने विवाहीत पुरुषाचं अपहरण करून त्याच्या घरी नेलं आणि तिथे त्याच्यावर बलात्कार केला. लुईझने हे आरोप फेटाळून लावले आहेत. विवाहीत पुरुषासोबतचे लैंगिक संबंध हे आपण त्याच्या संमतीमुळेच प्रस्थापित केले होते असं त्याने म्हटलंय. हा सगळा प्रकार 2021 साली घडला असून या प्रकरणाचा अधिकचा तपशील कोर्टातील सुनावणीमुळे जगजाहीर व्हायला लागला आहे.