आंतरजातीय विवाह करणाऱ्या विवाहितेची पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

1012

कुटुंबाचा विरोध झुगारून दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या विवाहितेने पतीच्या मानसिक व शारीरिक त्रासला कंटाळून गळफास घेतला. ही घटना मंगळवार घडली असून बुधवारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलेल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. बापुसाहेब रोंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रिती रोंगे (वय – 22, रा. कुमशी ता.बीड) हिने 20 मे, 2019 रोजी गावातील सचिन कळस्कर (27) याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. लग्नानंतर ते दोघे पती-पत्नी गेवराई जिल्हा बीड येथील भगवान नगरमध्ये भाड्याने खोली करून राहत होते. लग्नानंतर काही दिवसांनी सचिनने पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. ‘माझ्या जातीच्या मुलीने दहा लाख रुपये हुंडा देऊन लग्न केले असते, तेव्हा तू मला तुझ्या आईवडीला कडून दहा लाख रुपये घेऊन ये, मला घर बांधून रहायचे आहे’, असा तगादा लावला.

यावरून दोघांमध्ये वादही व्हायचा. सचिनने त्रास देत असल्याचे प्रितीने नातेवाईकांना सांगितले. अखेर त्रास असह्या झाल्याने तिने मंगळवार रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असून याप्रकरणी बापुसाहेब रोंगे (49) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन कळस्कर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या