‘पवनी’वर शोककळा, संपूर्ण गाव रात्रभर झोपले नाही

50

सामना प्रतिनिधी । नागपूर

पाकडय़ांच्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेले मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे पार्थिव रविवारी त्यांच्या मूळ गावी येणार असल्याने अख्खं गाव शनिवारची संपूर्ण रात्रभर जागे राहिले. ‘पवनी’ गावावर शोककळा पसरली. शहीद मोहरकर यांच्या पार्थिवाच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती. रात्री गावातले लोक रस्त्यारस्त्यावर फुले घेऊन उभे होते.

शनिवारी दुपारी पाककडून कश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यात महाराष्ट्रातील भंडारा जिह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर शहीद झाले. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. ते कधी पवनीला आले की आपल्या मित्रमंडळींना आवर्जून भेटत. अधिकारीपदावर असूनही त्यांनी कधीही त्याची इतरांना जाणीव होऊ दिली नाही. ते सर्वांना सोबत घेऊन चालत असत. शनिवारी या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली तेव्हा त्यांची पत्नी माहेरी पुणे येथे होती तर त्यांचे आईवडीलही पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र माहिती मिळताच ते पुलगाववरून परत गावी आले.

प्रफुल्ल यांचे प्राथमिक शिक्षण जुनोना गावात झाले, तर माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतरचे संपूर्ण शिक्षण गावाबाहेर झाले. त्यांनी बारावीनंतर इंजिनीयरिंग केले. मात्र देशसेवेचे ध्येय असल्याने इंजिनीयरिंग सोडून त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश घेतला. ते लेफ्टनंट म्हणून आठ वर्षांपूर्वी सैन्यदलात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांची मेजरपदावर पदोन्नती झाली. त्यांचा तीन वर्षांपूर्वी अबोली यांच्याशी विवाह झाला होता. शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचे वडील अंबादास हे सेवानिवृत्त शिक्षक व आई शिक्षिका आहेत. लहान भाऊ परेश मोहरकर पुण्यात नोकरी करत आहेत. शहीद मोहरकर यांना त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच वीरमरण आले.

शहीद मेजर मोहरकर यांना आदरांजली!

वायुसेनेच्या विशेष विमानाने शहीद मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांचे पार्थिव नागपूर येथील हवाई दलाच्या एअर बेसवर रविवारी सायंकाळी ७.३० वाजता आणण्यात आले. आदरांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव भंडारा जिह्यातील पवनीकडे रवाना करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या