शहीद सौरभ फराटे यांचे स्मारक उभारणार

पुणे, (प्रतिनिधी)

देशासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणार्‍या शहीद सौरभ फराटे यांचे स्मरण व्हावे, यातून प्रेरणा मिळून लष्करात जाण्यासाठी नवी पिढी सज्ज व्हावी, यासाठी त्यांचे यथोचित स्मारक उभारण्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली. या प्रेरणास्थानासाठी राज्य सरकारतर्फे मदत करणार असल्याची ग्वाही जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
शहीद फराटे यांना श्रद्धांजली अर्पण करताना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, देशाचा तरुण नवजवानाला अतिरेक्यांचा सामना करताना वीरमरण आले, देशाच्या संरक्षणासाठी जीवनाचे बलिदान करत मातृभूमीचे रक्षण करणार्‍या सौरभ फराटे यांचा राष्ट्राला अभिमान वाटतो. राज्यातील जनतेच्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो.

महापौर जगताप म्हणाले, भारतमातेच्या या थोर सुपुत्राला दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. शहीद जवांनाच्या वीरत्व व समर्पणामुळे देश सुरक्षित आहे. पुणेकर नागरिक आणि महापालिकेच्या वतीने सौरभ फराटे यांना मानवंदना अर्पण करतो.
खासदार अनिल शिरोळे म्हणाले, शहीद सौरभ फराटे दहशतवादविरोधात लढाई लढताना शहीद झाले आहेत. यांचे बलिदान केंद्र सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, याची मी ग्वाही देतो आणि प्रतिज्ञा करून शद्धांजली वाहतो.

माजी महापौर वैशाली बनकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अमोल हरपळे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव रायकर, माजी जिल्हा परिषद सदस्या कौशल्या हरपळे, माजी पंचायत समिती सदस्य शंकर हरपळे, नगरसेवक विजय देशमुख, पंचायत समिती सदस्य रोहिणी राऊत, तालुका उपप्रमुख कैलास ढोरे, विभाग उपप्रमुख संतोष होडे, सचिन हरपळे, दत्ता राऊत, गणेश ढोरे, अमित हरपळे, चांद महम्मद शेख यांच्यासह शिवसैनिक, युवा सेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.