दहशतवाद्यांशी लढताना शहिद झालेल्या भूषण सतई यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या गुरेज बाधिपुरा सेक्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात नागपूर जिल्ह्यातील काटोल निवासी भूषण रमेश सतई हा जवान शहीद झाले. ही घटना शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास जम्मू काश्मिरातील सीमेवर घडली. शहिद भूषण यांचे पार्थिव आज विशेष विमानाने नागपुरात पोहोचले असून उद्या त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

28 वर्षीय भूषण सतई गेल्या 9 वर्षांपासून भारतीय सैन्यातील 6 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होता. देशभक्तीने ओतप्रोत असलेला भूषण नेहमीच पुढे जात शत्रूचा सामना करीत असे. देशात दिवाळीचे स्वागत होत असताना पाकिस्तानने सीमेवर भ्याडपणे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विविध भागात गोळीबार केला. यात भारताचे तीन जवान शहीद झाले. यामध्ये काटोल नगरीच्या भूषणचा समावेश आहे. लढवय्या वृत्तीचा न डगमगणारा असा माझा मुलगा देशाच्या संरक्षणासाठी शहीद झाला हे ऐकून धक्का बसला आहे. परंतु, देशासाठी प्राणपणाने लढणार्या माझ्या भूषणवर मला गर्व असल्याचे मोठय़ा अभिमानाने त्याचे वडील रमेश सतई यांनी सांगितले. रमेश सतई हे मजुरीचे काम करतात. लहानपणापासूनच भूषणला सैन्याची ओढ होती. त्यानुसार तो सैन्यात भरती झाला होता. हाच भूषण सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झाल्याची वार्ता काटोलमध्ये येताच सर्वत्र खळबळ उडाली. अनेकांनी सतई कुटुंबीयांची भेट घेत त्यांना सांत्वना दिली. ऐन दिवाळीत कर्ता मुलगा असा गेल्याने फैलपुरा काटोल निवासी सतई कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.

दरम्यान खराब हवामानामुळे भूषणचा पार्थिव देह नागपुरात पोहोचण्यास उशीर होत होता मात्र, आज सायंकाळी विशेष विमानाने त्याचा मृतदेह नागपुरात पोहोचला. सध्या त्याचा मृतदेह कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्डसच्या मुख्यालयात नेण्यात आला असून रात्रभर हा मृतदेह कामठी येथेच ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी 8 वाजता त्याच्या पार्थिवाला लष्कराकडून मानवंदना दिली जाईल त्यानंतर तो काटोल येथे त्याच्या निवासस्थानी नेण्यात येईल. उद्या सकाळी 11 च्या सुमारास भूषणच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या