मारुती चितमपल्ली

>>प्रशांत गौतम

मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण करणाऱया मारुती चितमपल्ली यांना राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे. सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. पुरस्कारासाठी चितमपल्ली यांची झालेली निवड उचितच म्हणावी लागेल. मारुती चितमपल्ली ओळखले जातात ते निसर्गाचे, जंगलातील पशू-पक्षी, प्राण्यांचे उत्तम चित्रण करणारे ललित लेखक म्हणून. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, घरटय़ापलीकडे, पाखरमाया, चैत्रपालवी, केशराचा पाऊस, रानवाटा यासारख्या विविध पुस्तकांतून चितमपल्ली यांचे लिखाण अत्यंत वेगळे ठरले आहे. ‘चकवाचांदण: एक वनोपनिषद’ हे पुस्तक म्हणजे चितमपल्ली यांचे आगळय़ावेगळय़ा पद्धतीचे आत्मकथन होय. निसर्गाचे विविधांगी चित्रण करणे हा त्यांच्या लेखनाचा स्वभावधर्मच म्हणावा लागेल. उत्तम प्रतिभा लाभलेले चितमपल्ली राज्य शासनाच्या वन विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करीत उपसंचालक म्हणून व्याघ्र प्रकल्पातून १९९० साली सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे.

एकाचवेळी ललित लेखक म्हणून बजावलेली भूमिका आणि त्याचवेळी त्यांच्यातील वनाधिकारी समांतररीत्या सक्रिय होते. सेवाकाळ आणि निवृत्तीनंतर अनेक संस्थांच्या समितीत त्यांचा हिरीरीने सहभाग राहिला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालकपदही त्यांनी भूषविले. मराठी साहित्यात दुर्गा भागवतांनी ऋतुचक्र या पुस्तकातून चैतन्यशील आणि गतिमान अशा निसर्गातील जीवनचक्राचे दर्शन घडवले. व्यंकटेश माडगुळकरांनी आपल्या तल्लख प्रतिभेतून जंगलातील दिवसाचे लालित्यपूर्ण चित्रण केले. याच पायवाटेने चितमपल्ली यांनी आपला प्रवास सुरू ठेवला. चकवाचांदण या आत्मकथनाचे शीर्षकच त्यांनी अत्यंत नादमधुर आणि जीवनानुभवाशी निगडित असे ठेवल्याचे आढळते. शीर्षकाप्रमाणेच त्याचं सहशीर्षकही तेवढेच सार्थ आणि आकर्षक आहे.

आत्मकथनाच्या पुस्तकाच्या नावाचा अर्थ एका पारध्याने लेखकाला सांगितला, ‘चकवाचांदण म्हणजे घुबड! रानामध्ये संध्याकाळच्या वेळी घुबडाचा घुत्कार ऐकू आला की रानातील पारधी गोंधळतात. आवाजाची दिशा फसवी असते, मग ते लोक असेच रानात बसून राहतात. काही काळानंतर जेव्हा आकाशात शुक्राची चांदणी उगवते तेव्हा तिच्या प्रकाशात त्या पारध्यांची रानभूल उतरते. आणि त्यांना लागलेला चकवा निघून जातो. त्या चांदण्यांच्या प्रकाशात ते पुढील वाट चालू लागतात.

चकवा घालवणारं चांदण म्हणून चकवाचांदण’. पारध्याने केलेला खुलासा चितमपल्ली यांना खूप आवडला आणि त्यांना तो संधीप्रकाश आणि गुढता याचे प्रतीक वाटला. अशा प्रकारचे आत्मकथन मराठी साहित्यामध्ये वैशिष्टय़पूर्ण ठरले. चितमपल्ली यांच्या लेखनाचा आजपर्यंत विविध पुरस्कारांनी गौरव झाला. त्यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने मोलाची भर पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या