आम्ही आता राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओए) सूचना करणंच बंद केलं आहे. कारण प्रत्येक वेळी ते आमच्या सूचनांना केराची टोपली दाखवतात, असा गंभीर आरोप ‘आयओए’च्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षा व महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम यांनी केला आहे, मात्र ‘आयओए’च्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
‘आयरओए’मध्ये सध्या दोन गट पडल्याने त्यांच्यातील वाद चव्हाटय़ावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना मेरी कोम म्हणाली, मी ‘आयओए’च्या कामकाजात सहभागी नाहीये. याआधी आम्ही ‘आयओए’सोबत अनेकदा चर्चा करायचो, मात्र आम्ही मांडलेल्या सूचनांकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आम्हीही आता त्यांच्याशी चर्चा करणे बंद केले आहे. मी काही राजकीय व्यक्ती नाहीये, त्यामुळे कोणाला दोष देण्याचेही कारण नाही. पॅरिस ऑलिम्पिकमधून हिंदुस्थानी बॉक्सर रिकाम्या हाताने मायदेशी परतले, ही माझ्यासाठी अत्यंत वेदनादायक बाब होती, असेही मेरी कोमने सांगितले.
‘पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने माझ्यासारख्या अनुभवी खेळाडूकडे काहीच मदत किंवा मार्गदर्शन मागितले नाही. माझ्या अनुभवाच्या शिदोरीचा त्यांना नक्कीच काहीतरी उपयोग झाला असता. मी खेळाडूंना त्यांच्या कमकुवत आणि मजबूत बाबी कुठल्या आहेत. कुठे सुधारणा करायला हवी, एवढं तर नक्कीच सांगू शकले असते, मात्र दुर्दैवाने तसं घडलं नाही.’
– एम. सी. मेरी कोम