वऱ्हाडी सावचित, मास्क लावा मस्त! अन्यथा मंगल कार्यालयाना सील ठोकणार, मनपा प्रशासकांचा इशारा

फोटो प्रातिनिधिक

लग्न समारंभात वऱ्हाडींनी मास्क लावला नाही तर संबंधित मंगल कार्यालयाच्या चालक-मालकांना जबाबदार धरुन मंगल कार्यालय एक महिन्यासाठी सील केले जाईल असा इशारा महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला आहे. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने मास्क लावला पाहीजे यावर संबंधित दुकानदाराची नजर असणे गरजेचे आहे. ज्या दुकानात विनामास्क ग्राहक दिसतील ती दुकाने देखील आता सील केली जातील असे पाण्डेय म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क हेच प्रभावी साधन आहे. मास्क न वापरणाऱ्यांना आता अधिक कठोरपणे कारवाई केली जाणार आहे असे सांगताना आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगल कार्यालये, लॉन्सचा विषय काढला. लग्न समारंभासाठी मंगल कार्यालयात वऱ्हाडींची गर्दी होत आहेत. वऱ्हाडींपैकी बहुतेकांच्या नाकावर मास्क दिसत नाही. त्यामुळे वऱ्हाडींच्या नाकावरील मास्कची जबाबदारी मंगल कार्यालय चालक- मालकांवर टाकण्याचे मनपाने ठरवले आहे.

या बद्दल मंगल कार्यालयाशी संबंधित असलेल्यांशी चर्चा केली जाणार असून एक आदेश  त्यांच्या नावे काढला जाणार आहे. वऱ्हाडींनी मास्क घातलेला नसेल तर संबंधित मंगल कार्यालय एक महिन्यासाठी बंद केले जाईल असा उल्लेख त्या आदेशात असेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांच्या मास्कची जबाबदारी आता दुकानदारांवर

दुकानांमध्ये मास्क न घातलेले ग्राहक आढळले तर संबंधित दुकान सील केले जाईल. ग्राहकांच्या मास्कची जबाबदारी आता दुकानदारांवर असणार आहे. मास्क घातलेल्या ग्राहकांनाच दुकानदारांनी आपल्या दुकानात प्रवेश द्यावा, त्यांनी ग्राहकांना मास्कची सक्ती करावी असे आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले. विनामास्क फिरणाNया नागरिकांवर महापालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहेच, पण कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक कठोरपणे केली जाईल असा इशारा देखील पाण्डेय यांनी दिला आहे.

लॉकडाऊन करण्याचा विचार नाही

कोरोना पासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. शहरात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरच या संदर्भात विचार होईल. येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या चारशे किंवा पाचशे पर्यंत गेली तरच हे शक्य आहे. रुग्णसंख्या दोनशेपर्यंत गेल्यास परिस्थिती खूप हाताबाहेर गेली नाही असे म्हणता येईल. नागरिकांनी फक्त आणि फक्त मास्कचा वापर केला पाहिजे असेही पाण्डेय यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या