Mask Scam – मुखपट्टी विक्रीच्या नावाखाली थूकपट्टी, आरोपीचा जामीन फेटाळला

441

अहमदाबादमधल्या सत्र न्यायलयाने मास्क विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. यामुळे पोलिसांचा त्याला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आरोपीने एका महिलेला 25 लाख रुपयांचा चुना लावला होता. तिला फसवणाऱ्यांची संख्या 3 पेक्षा जास्त असल्याचं कळालं आहे. यातल्या तरुणसिंह वाघेला नावाच्या आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जो न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

33 वर्षांच्या मनाली सेठ हिने मास्कचा व्यवसाय करायचं ठरवलं होतं. तिने यासाठी 25 लाख रुपयांचे मास्क मागवले होते. तिच्याकडून आरोपींनी पैसे तर घेतले मात्र मास्क काही दिले नाहीत असं तिने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचे जबाब नोंदवले होते, यामध्ये त्यांनी तरुणसिंह याचेही नाव घेतले होते. यामुळे त्याचेही नाव आरोपींच्या यादीत सामील करण्यात आले.

तरुणसिंहच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की त्याचं नाव या खटल्यात उगाच घेण्यात आलेलं आहे. त्याच्या बँक खात्याचा किंवा मोबाईल नंबरचा FIR मध्ये कुठेही उल्लेख नाहीये. पोलीस तक्रारीत तरुणसिंहची भूमिका नमूद केली नाहीये, शिवाय इतर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे त्यामुळे तरुणसिंह यालाही जामीन मिळावा असं त्याच्या वकिलांनी म्हटलं होतं.

सरकारी वकील सुधीर ब्रम्हभट यांनी युक्तिवाद करताना म्हटले की वाघेला विरोधात अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्याच्याविरोधातील चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन दिला जाऊ नये. वाघेला याला 25 लाखातील 19.90 लाख रुपये मिळाले होते असं पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या