सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचे चित्र, ‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

‘मासूम सवाल’ या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचे चित्र वापरल्याने हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली आता मासूम सवाल या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित राठोड यांच्या तक्रारीवरून चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय, त्यांची कंपनी आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार, चित्रपट निर्मात्याने पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचे चित्र वापरले आहे.

दरम्यान राठोड म्हणाले की, हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्तरप्रदेशातील साहिबाबाद आणि गाझियाबादमधील दोन सिनेमा हॉलच्या बाहेर चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करतील. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही चित्रपटगृहांबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.

मासूम सवाल हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे. मात्र या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये भगवान श्रीकृष्णाचे चित्र सॅनिटरी पॅडवर दाखविण्यात आल्याने आता खळबळ उडाली आहे.