
यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलिसांनी कोळशाची अवैध विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान वणी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने 8 ट्रक ताब्यात घेतले आहेत. मुकुटबन आणि वणीदरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की सरकारला रॉयल्टी न देता, जीएसटीची रक्कम न भरता आणि आयकरही न भरता कोळशाची अवैध वाहतूक केली जात आहे. या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. हे ट्रक नेमके कोणाचे आहेत आणि हा कोळसा घोटाळा किती मोठा आहे हे चौकशीअंतीच कळू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी जे 8 ट्रक ताब्यात घेतले आहेत त्यातून एकूण मिळून 1.70 कोटी रुपयांचा कोळसा जप्त करण्यात आला आहे. हा कोळसा घोटाळा 400 कोटींचा असू शकतो असा या कारवाईशी निगडीत लोकांनी दावा केला आहे. या अवैध कोळसा विक्री आणि वाहतूक प्रकरणाचे धागेदोरे बीएस इस्पात कंपनीपर्यंत पोहोचू शकतात असाही दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी या अवैध कोळसा विक्री आणि वाहतूक प्रकरणी वाहतूक व्यावसायिक किशोर अग्रवाल यांना चौकशीसाठी बोलावले असल्याचे कळते आहे. या कारवाईमुळे खाणमाफियांचे धाबे दणाणले असून योग्य तपास झाल्यास एक मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.