शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवर हाणामारी, असिस्टंटने डायरेक्टरच्या कानाखाली लगावली

अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र बुधवारी हा चित्रपट एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. अॅक्शन सिन शूट करता करता या सेटवर चक्क रिअल फाईट सिन पाहायला मिळाला. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांना त्यांच्या असिस्टंट डायरेक्टरने कानाखाली लगावल्याचे समोर आले आहे.

सिद्धार्थ आनंद यांना सेटवर प्रचंड शांतता व शिस्त लागते. मात्र त्यांचा असिस्टंट डायरेक्टर त्यांना फाट्यावर मारत सतत काही ना काही गोंधळ करत होता. सिद्धार्थ यांनी सेटवर फोन आणण्यास मनाई केली होती. मात्र त्याने ते देखील ऐकले नाही. तो असिस्टंट त्याच्या हाताखालच्या लोकांना शिवीगाळ करत होता. सिद्धार्थ आनंद यांनी त्याला दोन तीनदा समज दिली. मात्र तो ऐकत नसल्याचे पाहून ते त्याला ओरडू लागले. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. तो ऐकत नसल्याचे पाहून सिद्धार्थ यांनी त्याच्या कानाखाली मारली. त्यानंतर त्याने देखील सिद्धार्थ आनंद यांच्या कानशिलात लगावली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर सेटवरील वातावरण तापलं होतं. सिद्धार्थ यांनी तत्काळ त्या असिस्टंटला तेथून हाकलून दिले.

पठाण या चित्रपटातून बॉलिवूड किंग शाहरुख खान तब्बल तीन वर्षानंतर चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात शाहरुख सोबत दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम व डिंपल कपाडीया देखील दिसणार आहेत. पठाणच्या आधी शाहरुख 2018 मध्ये झीरो या चित्रपटात दिसला होता.

आपली प्रतिक्रिया द्या