वास्तूशास्त्राप्रमाणे अशी असावी मुलांची बेडरूम

438

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)

हल्ली मुलांची बेडरूम असणे अपरिहार्य आहे. भारतीय संस्कृतीत मुलांची बेडरूम ही संकल्पनाच नव्हती. त्यामुळे पालक आणि मुले ह्यांच्यामधील नातेसंबंध घट्ट होते. नंतरच्या काळात आई -बाबा दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे दिवसभर बाळ पाळणाघरात किंवा बाळाला सांभाळण्यासाठी मावशीबाई घरी असणे हे चित्र दिसू लागले.

आता तर बाळासाठी २४ तास मावशी किंवा दीदी घरी असते. दिवसभर ते मुलं असतं मावशीकडे आणि मग रात्री स्वतःच्या बेडरूममध्ये. अमेरिकेत म्हणे अशीच पद्धत आहे आणि त्यामुळे मुलं लवकर स्वावलंबी आणि समजदार होतात.आपली भारतीय जोडपी जी अमेरिकेत राहून आलेली आहेत त्यांना तर ह्या गोष्टीचं खूपच कौतुक असतं. परंतु त्या अमेरिकन मुलांचं पुढे काय होतं? आई-वडिलांपासून ती दुरावतात आणि मग ही मुले कोवळ्या वयात ड्रग्स आणि तत्सम गोष्टींच्या आहारी कशी जातात? ह्याचा कधी विचार केला आहे का? खरंच मुलांची बेडरूम ही संकल्पना बरोबर आहे का? ह्याचा नक्की विचार व्हावा.

furniture

अभ्यासासाठी एक स्वतंत्र खोली असणे हे मान्य परंतु संपूर्णतः तुमच्या मुलाचा बेडरूममुळे तुमच्याशी संबंध दुरावत असेल तर मात्र ही संकल्पना टाळलेलीच बरी !!! मुलांच्या खोलीत व्यवस्था अशी असावी की त्यांचे अभ्यासात लक्ष लागावे. त्याच संदर्भातल्या काही टिप्स देण्यासाठी आजचा ब्लॉग.

दिशा – मुलांची बेडरूम वास्तूच्या ईशान्य ( North East ) ह्या दिशेला असावी. अगदी ईशान्य दिशेला खोली नसल्यास पूर्वेला किंवा उत्तरेला असलेल्या खोलीत अभ्यास करावा.

खिडक्या – पूर्वेला खिडकी असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ह्याचे कारण असे की पूर्वेकडून सकाळची जी उन्हे येतात त्यामुळे मुलांना नैसर्गिकरित्या “ड” जीवनसत्त्व म्हणजेच व्हिटॅमिन “D” मिळत राहील. त्यांची बुद्धीही तल्लख राहील आणि शारीरिक बळकटीही राहील.

अभ्यासाचे टेबल – मुलांचे अभ्यासाचे टेबल हे पूर्व दिशेला मुलांचा चेहरा येईल असे असावे. टेबल हे लाकडाचेच असावे. फायबरचे टेबल अजिबात वापरतात असू नये. टेबलाचा रंग नैसर्गिक असावा फार भडक असू नये. टेबलाचे कोपरे हे गोलाकार आकारात असावेत. (तीक्ष्ण असू नयेत ) टेबलावर वस्तूंचा फार पसारा असू नये. हल्ली मुलांच्या अभ्यासक्रमात कॉम्प्युटर हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे टेबलवर कॉम्प्युटर, पेन स्टॅन्ड ह्या शिवाय वस्तू असू नयेत. अभ्यासाच्यावेळी टेबल मोकळे असले म्हणजे व्यवस्थित लक्ष एकाग्र करता येईल.

खुर्ची – खुर्चीची उंची तुमच्या मुलाच्या उंचीप्रमाणे असावी. खुर्ची लाकडाचीच असावी. खुर्चीच्या कडा ह्या तीक्ष्ण असू नयेत. मुलांच्या पाठीला आणि मानेला आधार राहील अशी खुर्ची असावी.

रंग – भिंतीचा रंग हा फिक्कट हिरवा किंवा पांढरा असावा. खोली पूर्व दिशेला असल्यास फिक्कट भगवा, पिवळा रंग चालू शकेल. विविध रंगसंगतींच्या वापरामुळे बेडरूमचे वातावरण प्रफुल्लीत वाटावे.

चित्रे – भिंतीवर मुलांच्या वयानुसार त्यांना आवडेल अशी चित्रे लावता येतील.

बुद्धिदेवता – सरस्वती चिन्ह किंवा गणेशाचे चित्र असावेच. हल्ली वेगवेगळ्या प्रकारची, आकर्षक “डिकल्स” बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा छान उपयोग होऊ शकेल. अगदी लहानमुलांसाठी डिकल्समध्ये पाढे, वेगवेगेळी अक्षरे, रात्री चमकणारी चित्रे उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही नक्की वापर करा.

बेड – मुलांचा बेड हा दक्षिण आणि उत्तर असावा. दक्षिणेला डोकं येईल अशी रचना करावी. बेडची उंची वयानुसार असावी. चादरीचा रंग फिक्कट हिरवा,गुलाबी,निळा असावा.

पडदे – पडद्यांचा रंग भिंतींच्या रंगाला साजेसा असावा. पडद्याचा कपडा हा सुती असावा. काही घरात मी प्लॅस्टिकचे पडदे पाहीले आहेत. प्लॅस्टिकमुळे उष्णता शोषली जात नाही त्यामुळे प्लॅस्टिक टाळावे.

बुक शेल्फ किंवा कपाट – बुक शेल्फ हे दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावे. हे शक्यतो लाकडाचे असावे आणि ह्या शेल्फला दार असावे. पुस्तके झाकली जातील अशी रचना असावी.

मुलांच्या खोलीत आठवड्यातून दोनदा धूप करावा. धूप केल्याने खोली निर्जंतुक राहण्यास मदत होईल.

उत्तर दिशेत किंवा ईशान्य दिशेत एका चिनी मातीच्या भांड्यात “क्रिस्टल्स” ठेवावेत. त्यावर सकाळची उन्हे पडतील अशी रचना असावी.

बेडरूममध्ये पाणी ठेवणार असाल तर हे पाणी तांब्याच्या भांड्यात असावे. तांब्याच्या भांड्यामुळे रक्त शुद्ध होण्यास आणि रक्त वाढण्यास मदत होते. तांब्याचे भांडे आणि तांब्याचा पेला असावा.

थोडक्यात मुलांच्या बेडरूममध्ये नैसर्गिक प्रकाश भरपूर प्रमाणात असावा. हवा खेळती असावी. भडक रंगाचा वापर टाळून, मुलांना आवडतील अशा रंग संगतीचा वापर करावा. चित्रे किंवा डिकल्सचा वापर अभ्यासासाठी होईल असे पहावे.

ही खोली मुलांची जरी असली आणि तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुढाकार जरी करीत असलात तरी तुमची मुले काय करतात ह्यांवर लक्ष ठेवणे हे पालकांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे वेळोवेळी खोली चेक करणे.

मुलांच्या बेडरूमसाठी टिप्स दिल्या आहेत परंतु प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि त्याचे भविष्य वेगळे आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुंडलीप्रमाणे खोलीमध्ये बदल करणे किंवा सजावट करणे उपयोगी ठरेल.

प्रतिक्रिया नक्की कळवा. [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या