माथेरानच्या अनधिकृत बांधकामावर सोमवारी हातोडा पडणार?

24

माथेरान – हरित लवादाने २००३ नंतरच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा अंतरिम आदेश दहा जानेवारीच्या सुनावणी दरम्यान दिला होता. यासाठी २१ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने माथेरान मधील बांधकामे काढण्याच्या हालचाली सुरु केल्यामुळे माथेरानकर हवालदिल झाले आहेत. माथेरानमध्ये या विषयावरून तणावाची परिस्थिती आहे.

सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्यावतीने रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली उगले आणि रायगडचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना सहानभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती करण्यात आली. उपनगराध्यक्ष आकाश चौधरी ,माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

आदेशाचे पालन करणे आमचे कर्तव्य असून माथेरान मधील अतिक्रमणे दूर करणे ही आमची भूमिका आहे. हरित लवादाच्या आदेशानुसार प्रशासन कारवाई करेल असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांवर वन जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाबाबत वन खात्याने देखील गंभीर हालचाली सुरु केल्या आहेत. एकूणच हरित लवादाच्या निर्णयानुसार माथेरान मधील बांधकामावर लवकरच हातोडा पडणार आहे.

रायगडच्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन माथेरानकरांबाबत सहानभूती बाळगून हस्तक्षेप करण्याची विनंती केली मात्र त्यांनी यामध्ये हस्तक्षेपास नकार दिल्याने हरित लवाद समोर पुनर्विचार याचिका करणे किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून या आदेशास स्थगिती मिळवणे हे दोन पर्याय माथेरानकारांसमोर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या