लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला तीन लाखांचा गंडा

एका मॅट्रीमोनियल अ‍ॅपवर ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत भामटय़ाने 31 वर्षीय तरुणीला तीन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. सुरुची (नाव बदललेले) ही एका ठिकाणी सोशल मीडिया मँनेजमेंटचे काम करते. तिने एका मँट्रोमोनियल अ‍ॅपवर नोंदणी केली होती. त्या अ‍ॅपवर आरोपीने तिला संपर्क साधला. परदेशात डॉक्टर असल्याची ओळख सांगत त्याने सुरुचीसोबत लग्न करायला तयारी दाखवली. दरम्यान सुरुचीला एका महिलेचा कॉल आला आणि तिने कस्टम विभागाची अधिकारी असल्याची सांगून दिल्ली विमानतळावरून बोलत असल्याचे सांगितले. आम्ही एका व्यक्तीला पकडले असून तो तुझ्या ओळखीचा आहे असे सांगत पकडलेल्या व्यक्तीशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने मी दिल्लीत आलो असून माझ्याकडे भरपूर परकीय चलन असल्याने कस्टमवाल्यांनी पकडले आहे. त्यामुळे टॅक्स भरण्यासाठी पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार सुरुचीने तीन लाख 12 हजार रुपये आरोपीने सांगितलेल्या खात्यावर पाठविले. पैसे मिळताच आरोपीने संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच सुरुचीने पोलिसात धाव घेतली.