
T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला लोळवत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. मॅथ्यू वेड हा या विजयाचा शिल्पकार ठरला. प्रसिद्धीझोतात आलेल्या मॅथ्यू वेडने त्याच्या आयुष्यात अत्यंत खडतर प्रसंग सोसले आहेत. 16 वर्षांचा असताना मॅथ्यूला कॅन्सर झाल्याचं कळालं. फुटबॉल सामना खेळत असताना दुखापत झाल्याने मॅथ्यू डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेला होता.तपासणीनंतर डॉक्टरांनी मॅथ्यूला बोलावून घेत त्याला अंडकोषाचा कर्करोग झाल्याचे सांगितलं होतं. हे ऐकून मॅथ्यू जबरदस्त हादरला होता. दोन किमोथेरपींच्या सेशन्समध्ये सराव सुरू ठेवण्याचा प्रयत्न हा अत्यंत कठीण होता असं मॅथ्यूने एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं होतं.
कॅन्सरमुळे खेळाकडे पुन्हा वळणं अशक्य झाल्याने मॅथ्यूने प्लंबिंग काम करायला सुरुवात केली होती. कॅन्सर आणि उपचारांचा मॅथ्यूच्या शरीरावर परिणाम झाला होता. केस गळायला लागल्याने आणि केमोथेरपीचा परिणाम शरिरावर दिसू लागल्याने मॅथ्यूने लोकांमध्ये मिसळणं जवळपास बंद केलं होतं.
कॅन्सरचा तडाखा सहन करणाऱ्या मॅथ्यूला रंगांधळेपणाचाही शाप आहे. यामुळे इतर क्रिकेटपटूंपेक्षा त्याला जास्त संघर्ष करावा लागला होता. दिवस-रात्र पद्धतीने खेळवण्यात येणारे कसोटी सामने हे त्याच्यासाठी खासकरून आव्हानात्मक बनले होते. कारण या सामन्यांसाठी वापरण्यात येणारा गुलाबी चेंडू त्याला नीट दिसायचा नाही.
2018 साली मॅथ्यू हा संघाबाहेर फेकला गेला होता, त्यावेळी त्याने सुतारकाम करायला सुरुवात केली होती. जवळपास 9-10 महिने तो हे काम करत होता. संघात पुनरागमन होईल की नाही या चिंतेत असलेल्या मॅथ्यूची अॅशेस मालिकेपूर्वी ‘अ’ संघात निवड झाली होती. मुख्य संघात निवड न झाल्याने मॅथ्यू निराश झाला होता. त्याने त्याच्या बायकोला फोन करून आपण निवड समितीला ‘अ’ संघातील माझी निवड रद्द करा असं सांगणार असल्याचं कळवलं होतं.
निवड समितीतील लोकांना माहिती होतं की माझा खेळ कसा आहे. माझी ‘अ’ संघातील तसेच मुख्य संघातील कामगिरीही त्यांना माहिती होती. त्यामुळे मी निवड समितीला स्पष्ट नकार देण्याच्या भूमिकेवर ठाम होतो असं मॅथ्यूने म्हटलं होतं. मॅथ्यूला त्याचा निर्णय बदलण्यासाठी त्याच्या बायकोने भाग पाडलं होतं. मॅथ्यूने संघ पुनरागमनासाठी बरेच कष्ट केले होते, त्याचे कष्ट वाया जाऊ नयेत यासाठी त्याची बायको ज्युलिया हिने तिची प्रसुती वेळेआधी करण्याचा निर्णय घेतला होता. खेळत असताना मॅथ्यू कोणत्याही कारणासाठी घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेला नसावा या एकमेव कारणासाठी तिने हा निर्णय घेतला होता.