रिस्ट बँडची ऑर्डर घेऊन डॉन बॉस्को शाळेला चुना, चांगला मार्ग सोडून फसवेगिरीचा मार्ग स्वीकारला

रिस्ट बॅण्ड विक्रीचा व्यवसाय करणाऱया तरुणाने आपला मार्ग बदलला आणि या व्यवसायाच्या नावाने फसवणुकीचा धंदा सुरू केला. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट बनवून त्याने रिस्ट बॅण्डची ऑर्डर घेण्याच्या बहाण्याने डॉन बॉस्कोलाच आर्थिक चुना लावला. पण माटुंगा पोलिसांनी शिताफीने तपास करून त्या भामटय़ाची गठडी वळली.

माटुंगा पूर्वेला असलेल्या डॉन बॉस्को शाळेत फ्रान्सिस डिसुजा नोकरी करतात. एप्रिल 2022 मध्ये शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता समर कॅम्प आयोजित करायचा होता. समर कॅम्पदरम्यान त्यांना एकूण विद्यार्थ्यांना शाळेची ओळख म्हणून एक रिस्ट बॅण्ड द्यायचा होता. त्यासाठी रिस्ट बॅण्डची ऑनलाइन ऑर्डर देण्याकरिता संकेतस्थळावर शोध घेत असताना गुगलवर http://sublimationanalysis.buisiness.Site असा वेब पेज दिसून आला. त्या वेबपेजवर फिर्यादी यांनी एकूण 1500 रिस्ट बॅण्डची ऑर्डर प्लेस केली. त्यानंतर डिसुजा यांना एक कॉल आला व समोरून बोलणाऱया व्यक्तीने तुमची ऑर्डर कन्फर्म झालेली असून सदर ऑर्डरकरिता तुम्हाला रुपये 15,300 ऑनलाइन पेमेंट करावे लागेल, असे सांगितले. तसेच त्याकरिता समोरील व्यक्तीने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचा अकाऊंट क्रमांक दिला. त्याप्रमाणे डिसुजा यांनी 15,300 रुपये त्या बँक खात्यावर भरले. मग पुन्हा त्या व्यक्तीने कॉल केला आणि दोन ते तीन दिवसांत ऑर्डर घरपोच भेटेल असे सांगून फोन कट केला. तीन दिवसांनंतर रिस्ट बॅण्ड न आल्याने डिसुजा यांनी नमूद क्रमांकावर संपर्क केला असता संबंधित व्यक्तीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार संपर्क साधूनदेखील समोरील व्यक्तीने त्यांना उत्तर न दिल्यामुळे व कोणतेही प्रॉडक्ट न पाठवल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे डिसुजा यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात जाऊन फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

कुर्ल्यात सापडला भामटा

याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिगंबर पगार तसेच संतोष पवार आणि मंगेश जऱहाड या पथकाने तपास सुरू केला. आरोपीने अशा प्रकारे फसवणूक करण्यासाठी विविध बँकांमध्ये 13 बँक खाती खोलून पूर्वी राहत असलेल्या घराचे ठिकाणदेखील बदलले होते. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. पण तरीही पथकाने मोबाईल कॉल रेकॉर्ड व जी-मेल आयडी, बँक अकाऊंट तसेच गुह्यात वापरलेली संकेतस्थळाचा सखोल तांत्रिक तपास करून गुन्हा उघडकीस आणला. आरोपी अश्रफ शफी कुरेशी कुर्ल्यात सापडला.