यशवंत नाट्यसंकुलाचे पुनर्निर्माणः आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे राहणार

माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहाच्या जागी आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिएटर उभे केले जाणार आहे. याबाबतचा ठराव अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोमवारी मंजूर झाला. नाटयसंपुलाचे नूतनीकरण करण्यापेक्षा पुनर्निमाण करून आंतरराष्ट्रीय दर्जाची वास्तू उभी केली जाणार आहे, अशी माहिती नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, प्रवक्ते मंगेश कदम, उपाध्यक्ष नरेश गडेकर आदी उपस्थित होते. पुनर्निमाणासाठी एफएसआय, डिझाईन, आर्थिक तरतूद याचा विचार केला जाणार आहे.

धर्मादाय आयुक्तांचे पत्र मिळाले नाही

नाटय़परिषदेचे अध्यक्ष आणि काही पदाधिकारी मनमानी करत असून घटनेनुसार कारभार सुरू नसल्याची तक्रार सहकार्यवाह सतीश लोटके यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नुकतीच केली आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र यासंदर्भातील पत्र मिळाले नसल्याचे नाटय़परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी आज सांगितले. एकीकडे अध्यक्ष असा दावा करत असताना प्रवक्ते मंगश कांबळी यांनी ईमेल रविवारी रात्री 9.53 वाजता आल्याचे पत्रकारांना सांगितले. याबाबत कांबळी यांनी ई-मेलबद्दल माहीत नसल्याचा पुनरुच्चार केला.

हौशी रंगभूमीला आर्थिक मदत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यपरिषदेने गरजू रंगकर्मींना घटकसंस्थांच्या माध्यमातून एक कोटी 20 लाखांच्या मदतीने वाटप केले आहे. आता हौशी रंगभूमीलाही आर्थिक मदत केली जाणार आहे. 2019 मध्ये राज्य नाटय़ स्पर्धेत भाग घेतलेल्या 400 हून अधिक हौशी रंगभूमीवरच्या संस्था आहेत. या रंगकर्मींना मदत करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी प्राथमिक फेरीत भाग घेतल्याचे पत्र सादर करावे. इच्छुकांनी 15 ऑक्टोबरपर्यंत बँक खात्याच्या माहितीसह ई-मेल पाठवावे, असे आवाहन नाट्यपरिषदेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या