मावळच्या दऱ्याखोऱ्यात

129

<< भटकंती >> संदीप शशिकांत विचारे

सह्याद्री महाराष्ट्राचा मानदंड! दाट झाडी, निबीड अभयारण्य, घाट वाटा, खिंडी, दरी, कपारी, लांबच लांब सोंडा ही सह्याद्रीची ओळख. इथं वावर होता वाघांचा आणि मराठ्यांचा ! उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा उभ्या आणि आडव्या पसरलेल्या. सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या कृष्णा आणि प्रवरेच्या खोऱ्यांमध्ये चोवीस मावळे वसली आहेत. दोन डोंगर-रांगांच्या मधल्या खोऱ्याला म्हणतात मावळ. शिवकाळात एकेका मावळात पन्नास ते शंभर खेडी नांदत होती. जुन्नर – शिवनेरीखाली बारा आणि पुण्याखाली बारा असे हे चोवीस मावळे.

आज आपण दोन दिवसांच्या पुण्याजवळील बारा मावळांच्या मुशाफिरीला निघणार आहोत. बहुतांशी या मावळांची नावं तिथून वाहणाऱ्या नद्यांवरून पडली आहेत. कानंदी नदीचे कानंद खोरे, मुठा नदीचे मुठे खोरे, गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवनमावळ, आंद्रेचे आंदरमावळ. याच मावळातील काटक शूर मावळ्यांची एकजूट करून शिवराय छत्रपती जाहले आणि नखदकाद लिहिते झाले. ‘सकळ पृथ्वीवर मराठा बादशहा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य नव्हे!’

मुंबईहून एक्प्रेस वे ओलांडून कामशेत गाठावे. कामशेतच्या डाव्या हातास आंद्रेचे आंदरमावळ. कामशेतहून उजवीकडे पवनाधरणाच्या काठानी जाणाऱ्या निसर्गरम्य रस्त्यांनी पवनमावळात प्रवेश करावा. पुढे उजव्या हाताचा रस्ता लोहगड-विसापूर किल्ल्याकडे जातो. पवना धरण उजवीकडे ठेवत थोढ्या चढाईवर आलो की, पवना धरणाच्या जलाशयात पाय सोडून बसलेला तुंग किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. पुढे पवनानगर (काळे कॉलनी) सोडलं की डावीकडचा रस्ता तिकोना किल्ल्याकडे जातो. आपण तिकोन्याचे दूरदर्शन घेऊन तिकोनाच्या पुढ्यात असलेल्या जलाशयाजवळ थांबायचे. या जलाशयात बोटिंगचा आनंद घेता येतो. जवण गावाजवळील उजवीकडील फाटा आपल्याला घुसळखांब गावाकडे म्हणजे धनगड, तेलबैला या सह्याद्रीच्या मुख्य रांगेकडे घेऊन जातो. आपण कोळवण मार्गे पौड मावळाकडे निघायचे. पौडहून कोकणातून ताम्हणी घाटातून मुळशीमार्गे पुण्याकडे नेणाऱ्या रस्त्याने पिरंगुट गाठायचे. इथे पोटपूजा करून मुठा खोऱ्याकडे निघायचे. पिरंगुटच्या उजवीकडील रस्ता लव्हासाकडे जातो. याच रस्त्याला मुठे गाव आहे. मुठ्याहून खडकवासला धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांनी सांगरूण मार्गे खडकवासला धरण गाठायचे. वाटेत सैनिकी एनडीए अॅकॅडमी लागते. खडकवासलाहून डोणजे, खानापूर मार्गे मोसे खोऱ्यातील पानशेत गाठायचे. डोणज्यातून दिसणारी सिंहगडाची कातळ भिंत आपल्याला परातीएवढ्या छातीच्या तानाजी मालुसऱ्यांची याद करून देते. पानशेतला मुक्काम करीत दुसऱ्या दिवशी विल्हाकडे निघावे.

पानशेतचे मोसे खोरे प्रत्यक्ष उग्र मावळाच्या दर्शनाने आपल्याला सुखावते. मोसे आणि तव गावचे पाऊणशे वयमान असलेले वीर बाजी पासलकर हे शिवरायांचे बालसवंगडी! पानशेतहून कुरण खिंडीतून विल्हे गाठावे. पाने घाटातून विल्हे गाठता येते. कुरण खिंडीतून जाताना कानद खोऱ्यातील तोरणा आपले लक्ष वेधून घेतो. वेल्हातून खरीव पालमार्गे पालखिंड गाठायची आणि राजगडाच्या दूरदर्शनाने मोहरून जायचे. पालखिंडीच्या पलीकडे विस्तीर्ण जलाशयाच्या काठावर वसलेले भुतोडे सरसेनापती येसाजी कंकांचे गाव. मावळातील या सुपुत्राने गोवळकोंड्यांच्या बादशहाच्या हत्तीशी झुंज देउन ती जिंकली होती. इथला वारा, पाणी आणि उग्र सह्याद्री यांनी घडवलेली ही मावळी मनगटे. ही एकदा फुरफुरली की अफझलखान असो की शाहिस्ता, बहलोल खान असो की सिद्धी कोणाचीही खैर नसे. भुतोंडेहून बाजीप्रभूंचे सिंध आणि कान्होजींच्या कारीस भेट देऊन आपण मावळच्या दऱ्याखोऱ्यात भटकू शकता.

भुतोंडे-भोर रस्त्याचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. पाल खिंडीतून माघारी येऊन पाल – वाजेघर -नसरापूर मार्गे पुण्याहून मुंबईला परतू शकता. पानशेतला मुक्कामासाठी एम.टी.डी.सी. आणि इतर ठिकाणी निवासाची सोय होऊ शकते. चला तर महाराजांच्या मुलखात मावळच्या दऱ्याखोऱ्यांत जिथे नांदले हिंदवी स्वराज्य!

या मातीचे कण लोहाचे,

तृण पात्यांना खड़ग कळा।

कृष्णेच्या पाण्यात वाहत असे

अजूनही लाव्हा सगळा।

आपली प्रतिक्रिया द्या