लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या मागे भाजप नेत्याचा हात? – सुब्रमण्यम स्वामी

प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या हिंसक घटनेत भाजपच्या एका नेत्याचा हात असल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत ही शंका व्यक्त केली आहे.

deep-siddhu-with-modi

‘लाल किल्ल्यावर जे काही घडले त्यात पीएमओच्या अगदी जवळील भाजप नेत्याचा हात आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे’, असे ट्विट स्वामी यांनी केले आहे. भाजप खासदार सनी देओल याचा लोकसभेतील मुख्य प्रचारक दीप सिद्धू याच्यावर शेतकऱ्यांना भडकवल्याचा आरोप होत आहे. दीप सिद्धूचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो देखील व्हायरल होत आहे. त्याबाबतची एक बातमी देखील स्वामी यांनी रिट्विट केली आहे.

याआधी काही शेतकरी नेत्यांनी दीप सिद्धू याच्यावर शेतकऱ्यांना चिथवण्याचा आणि हिंसा घडवून आणण्याचा आरोप केला आहे. यानंतर दीप सिद्धू याने लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकल्याचा आरोपही झाल आहे.

सनी देओल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फोटो काढणाऱ्या दीप सिद्धू हा भाजप आणि आरएसएसचा एजंट असल्याचे म्हटले जाते. अर्थात दीप सिद्धूने हे आरोप वेळोवेळी फेटाळले.

कोण आहे दीप सिद्धू?

दीप सिद्धूचा जन्म 1984 मध्ये पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात झाला. त्याने पुढे लॉ कायद्याचे शिक्षण घेतले. किंगफिशर मॉडल हंट अवार्ड जिंकण्याआधी काही दिवस तो बारचा सदस्य देखील राहिला. 2015 मध्ये दीप सिद्धूचा पहिला पंजाबी चित्रपट ‘रमता जोगी’ रिलीज झाला. त्याला प्रसिद्धी 2018 मध्ये ‘जोरा दास नुम्बरिया’तून मिळाली ज्यामध्ये त्याने गँगस्टरची भूमिका केली होती.

वर्ष 2019 मध्ये अभिनेता सनी देओलने जेव्हा गुरुदासपूर येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा आपल्या प्रचाराच्या टीममध्ये दीप सिद्धू याला सोबत ठेवले होते. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसक घटनेनंतर सनी देओलने एक ट्वीट करत म्हटले आहे की ‘माझा किंवा माझ्या कुटुंबाचं दीप सिद्धूसोबत कोणतही नातं नाही.’

आपली प्रतिक्रिया द्या