मायावती इतक्या का थंडावल्या ? प्रियंका गांधींना पडलाय प्रश्न

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी सगळे पक्ष ताकदीने प्रचाराला लागलेले असताना एकेकाळी सत्तेत असलेला बसपा मात्र या पक्षांच्या तुलनेत फारसा सक्रीय दिसत नाहीये. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती उत्तरेकडच्या राजकारणात मानाचं स्थान मिळवलेल्या नेत्या आहे. असं असताना त्या आणि त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात का थंडावला असावा असा प्रश्न काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पडला आहे. प्रचार ऐन भरात आलेला असताना बसपा कुठेच दिसत नाहीये, ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब आहे, असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत प्रियंका यांना बसपाच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिथील कारभाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की ‘6-7 महिन्यांपूर्वी आम्हाला वाटलं होतं की निवडणुका जवळ आल्यानंतर मायावती यांचा पक्ष सक्रीय होईल, मात्र निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असतानाही मायावती आणि त्यांचा पक्ष सक्रीय झालेला नाही. मायावती इतक्या शांत का आहेत हे मलाही कळत नाहीये.’ मायावती यांच्यावर भाजपने दबाव टाकला असावा म्हणून त्या गप्प असाव्यात असा संशयही प्रियंका यांनी व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

उत्तर प्रदेशची विधानसभा जिंकण्यासाठी काँग्रेसनेही मोठी ताकद लावली आहे. शुक्रवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून सत्तेत आल्यानंतर 20 लाख युवक-युवतींना नोकरी देणार असल्यासह विविध घोषणा केल्या आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रियंका यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण स्वतःच असल्याचे स्पष्ट संकेतही दिले.

पत्रकारांनी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न प्रियंका यांना केला. त्यावर काँग्रेसमध्ये दुसऱ्या कोणाचा चेहरा दिसतोय का? उत्तर प्रदेशात सगळ्या ठिकाणी माझाच चेहरा दिसतोय ना, असे उत्तर देत प्रियंका यांनी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपणच असल्याचे संकेत पत्रकारांसमोर दिले. मात्र स्वतः निवडणूक लढवणार की नाही, याबाबत कुठलेही भाष्य केले नाही. काँग्रेसचा जाहीरनामा हा उत्तर प्रदेशातील सात कोटी युवक-युवतींच्या अपेक्षांचा खजिना आहे, असे नमूद करीत प्रियंका यांनी राज्यातील युवावर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा दावा केला.

प्रियंका गांधी यांनी याआधी महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात महिलांना मोफत प्रवास, वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत, सरकारी नोकरीत 40 टक्के आरक्षण देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत ‘महिला कार्ड’ वापरत 40 टक्के उमेदवारी महिलांसाठी राखीव ठेवली आहे.