Euro Cup Final – अंतिम सामन्यानंतर प्रसिद्ध रेसरला लुटले, 35 लाख रुपयांचे घड्याळ चोरल्याने लांडो नॉरीस घाबरला

इंग्लंड विरूद्ध इटली या युरो कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हुल्लडबाजांनी प्रचंड गोंधळ घातला होता. त्यांनी अनेकांना मारहाण केली, आरक्षित असलेल्या सीट बळकावल्या आणि वेंबली स्टेडिअम परिसरात प्रचंड गोंधळ घातला. या सगळ्याचा फटका लांडो नॉरीस नावाच्या एका प्रसिद्ध रेसरलाही बसला आहे.

lando-norris-car

सामन्यानंतर लांडो त्याच्या 1 कोटी किंमत असलेल्या मॅकलॉरेन जीटी या अतिवेगवान गाडीत बसला. त्याचवेळी त्याला काहीजणांनी घेरला. एकाने त्याला पकडलं आणि इतरांनी त्याच्याशी झटापट करायला सुरुवात केली. यावेळी एकाने त्याच्या हातातील ‘रिचर्ड मिल’ कंपनीचं घड्याळ चोरून नेलं. या घड्याळाची किंमत जवळपास 35 लाख रुपये इतकी आहे. सामन्याचा आनंद लुटण्यासाठी वेंबली इथे आलेला लांडो हा या घटनेमुळे पुरता हादरला आहे.

lando-norris-watch

सामना सुरू व्हायच्या आधीपासून हुल्लडबाज मैदानात घुसायला सुरुवात झाली होती. 900 युरो म्हणजे जवळपास 80 हजार रुपयांची तिकीटं काढून प्रेक्षक जेव्हा मैदानात आले तेव्हा त्यांना आरक्षित खुर्चीवर हुल्लडबाज बसलेले दिसले. प्रेक्षकांनी जेव्हा त्यांना उठायला सांगितलं तेव्हा या हुल्लडबाजांनी त्यांना दमदाटी करत तिथून हाकलून दिलं. सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंचे कुटुंबीय जिथे बसले होते, त्याच्यासाठी आरक्षित जागेतही घुसले होते. यामुळे खेळाडूंच्या प्रेयसी, मुले ही घाबरली होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

मैदानाच्या बाहेर आणि आत दोन्हीकडे फारशी पोलीस सुरक्षाव्यवस्था नव्हती. वेंबली पोलिसांसाठीचा सुरक्षा व्यवस्था खर्च उचलत नसल्याने ही सुरक्षा देण्यात आली नव्हती असं द सन या वर्तमानपत्राने बातमीत म्हटलंय. सुरक्षेसाठी खासगीरक्षक नेमण्यात आले होते. ज्यांना न जुमानता हुल्लडबाज मैदानात घुसले होते. इंग्लंड सामना हरल्याने या हुल्लडबाजांना अधिकच चेव चढला होता. त्यांनी दिसेल त्याला मारहाण करायला सुरुवात केली. खासगी सुरक्षा रक्षक हा सगळा तमाशा निमूटपणे पाहात होते. पोलिसांनी आतापर्यंत वेंबली मैदानात तमाशा करणाऱ्या 86 हुल्लडबाजांना अटक केली आहे. मैदान आणि परिसरात हुल्लडबाजी तब्बल 130 जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक हुल्लडबाज हे दारू पिऊन अंमली पदार्थ घेऊन आले होते असंही कळालं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या