जाणून घ्या, कसा असतो आर्थिक पाहणी अहवाल?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

केंद्राचा अर्थसंकल्प इतिहासात पहिल्यांदाच १ फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो. या आर्थिक पाहणी अहवालाचे महत्व काय आहे आणि तो का सादर केला जातो हे अनेकांना माहिती नाहीये. अर्थसंकल्प हा येणाऱ्या वर्षासाठीचा असतो तर आर्थिक पाहणी अहवाल हा सरलेल्या वर्षामध्ये देशाची आर्थिक स्थिती काय आहे हे दाखवणारा असतो.

आर्थिक पाहणी अहवालामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली जाते. गेल्या वर्षभरात देशाचा विकास कसा झाला, कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक झाली आहे. कोणत्या क्षेत्राचा विकास झाला,विविध योजनांची अंमलबजावणी कशी झाली यासारख्या बाबी ठळकपणे या अहवालातून मांडण्यात आलेल्या असतात. तसेच अर्थव्यवस्था त्याबाबतचे अंदाज याचाही उल्लेख केलेला असतो. कोणत्या क्षेत्रामध्ये सुधारणेची गरज आहे, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहीजेत याबाबतही सांगितलं जातं.

भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रांवर, कोणत्या कमजोर पैलूंवर जोर देणं आवश्यक आहे हे कळावं यासाठी आर्थिक पाहणी अहवाल महत्वपूर्ण ठरत असतो. एकाप्रकारे देशाच्या सद्यस्थितीचं दर्शन घडवणारा हा अहवाल असतो. या अहवालामुळे अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रांवर,कोणत्या योजनांवर जोर दिला जाऊ शकतो याचा अंदाज लावता येऊ शकतो.

आर्थिर पाहणी अहवालामध्ये फक्त सूचना केलेल्या असतात, त्या अंमलात आणाव्या यासाठी त्याला कायद्याचं अनुष्ठान देण्यात आलेलं नाही. म्हणजेच सूचना केलेल्या उपाययोजना अमलात आणल्याच पाहीजेत अशी काही गरज नसते. हा अहवाल  मुख्य आर्थिक सल्लागार, तसेच अर्थविषयक तज्ञांचं मत विचारात घेऊन तयार केला जातो. राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरूवातीला दोन्ही सदनांना उद्देशून केलेल्या अभिभाषणानंतर सरकार आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो

आपली प्रतिक्रिया द्या