ठाणे जिह्यात गोवरचा फैलाव,सर्वाधिक बाधीत भिवंडीत

गोवरचा फैलाव आता ठाणे शहर व जिह्यातही होत असून दीड महिन्यात आतापर्यंत 52 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक 37 रुग्ण भिवंडीतील असून जिह्याची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ग्रामीण भागात प्रतिबंधक लसी उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत गोवरचा धोका वाढत असतानाच आता ठाणे जिह्यात देखील  गोवर हातपाय पसरू लागला असल्याचे दिसून आले आहे. ठाणे शहरात  10, भिवंडी 37, ठाणे ग्रामीण 2 तर उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला. ठाणे महापालिका क्षेत्रातील  मुंब्रा, कौसा येथे गोवरचे प्रमाण जास्त आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रातील गोवरच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी तातडीने सर्व सामाजिक व आरोग्य विषयक संघटनांची बैठक बोलावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. तसेच घरोघरी जाऊन वॅक्सीनेशन सुरू केले असून लक्षणे आढळून आल्यास तातडीने पालिकेच्या रुग्णालयात तपासणीसाठी मुलांना आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.