पाप-पुण्याचा हिशोब आला अंगलट; मंदिरात दोन खांबामध्ये अडकले भाजप आमदार

आपल्या देशातील अनेक मंदिरात प्राचीन प्रथा-परंपरा पाळल्या जातात. तसेच अनेक मंदिरात विविध मान्यताही आहेत. मध्य प्रदेशातील रतलाममधील एका देवीच्या मंदिरात दोन खांब असून त्यांना पाप-पुण्याचे खांब म्हणून ओळखतात. या दोन खांबांमधून बाहेर पडणाऱ्या व्यक्ती पुण्यवान असल्याची मान्यता आहे. या मंदिरात भाजप आमदार दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची चांगलीच पंचायत झाली.

मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील रतलाम ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आणि भाजप नेते दिलीप मकवाना यांची मंदिरात चांगलीच गोची झाली. पाप-पुण्याच्या दोन खांबांच्यामध्ये आमदार अडकले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. देवीच्या मंदिरात मनोकामना पूर्तीसाठी त्यांनी दोन खाबांमधून बाहेर येण्याच्या प्रथा-परंपरेचं अनुकरण केलं. मात्र, ते त्यांच्या चांगलच अंगलट आले आणि त्यावेळी दोन्ही खांबाच्या मध्ये ते अडकले होते.

रतलामच्या प्रसिद्ध गुणावद गावातील डोंगरावर हिंगलाज माता आणि महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातच दोन जुने मोठे खांब आहेत. ज्यांना पाप-धर्माचे खांब म्हटले जाते. या दोन्ही खांबांमधील अंतर अत्यंत कमी आहे. त्यामुळेच, या दोन्ही खांबाच्या मधून जी व्यक्ती बाहेर निघू शकते ती, पुण्यवान आणि जो त्यातून निघू शकत नाही तो पापी आहे, असे मानले जाते. आमदार दिलीप मकवाना हे या दोन्ही खांबाच्या मधून सुखरुपपणे बाहेर आले. मात्र, काही वेळ खांबाच्या मधोमध अडकले असतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते दोन्ही खांबाच्या मध्ये अडकले असल्याचे दिसून येते. यावेळी ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते. आमदार मकवाना यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. काहींना त्यांना ट्रोल केले आहे. तर, अनेकांनी पाप-पुण्याचा हिशोब झाला, असेही म्हटले आहे.