आशियाई पदक विजेता विकतोय चहा हरीश कुमारची आर्थिक परिस्थिती बेताचीच

62

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुस्थानात क्रिकेटेतर खेळांना चांगले दिवस येऊ लागलेत असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अद्याप बदललेली नाही हे प्रकर्षाने दिसून येत आहे. एकीकडे सेलिंगमध्ये पदक जिंकणार्‍या श्वेता शेरवेगार हिच्याकडे दुर्लक्ष केले जाते तर दुसरीकडे ब्रिज (पत्ते) या खेळात पदक जिंकणार्‍या खेळाडूंनाही मान देण्यात येत नाही. पदाधिकारी बिझनेस क्लासमधून मायदेशी परततात, तर खेळाडूंना इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागतो. यामध्ये भरीसभर म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सेपाक तकरॉ या खेळामध्ये हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून देणारा हरीशकुमार सध्या चहाच्या टपरीवर चहा विकतोय ही खेदजनक बाब.  

माझे कुटुंब मोठे म्हणून

हरीश कुमार यावेळी म्हणाला, माझे कुटुंब मोठे असून कमावणारी माणसे कमी आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी मी वडिलांच्या चहा टपरीवर काम करतो. हे काम सांभाळून दुपारी 2 ते सायंकाळी 6 पर्यंतचा वेळ मी सरावासाठी राखून ठेवला आहे. हरीश कुमारचे वडील दिल्लीत रिक्षाचालक असून या व्यवसायातून
भागत नसल्याने त्यांनी  चहाची ही टपरी सुरू केली.

आता हवीय नोकरी

हरीश कुमारला सेपाक तकरॉ या खेळामध्ये उत्तुंग झेप घ्यावयाची आहे, मात्र  त्याआधी त्याला कायमस्वरूपी नोकरीची गरज आहे. वेळ घालवण्यासाठी स्थानिक पातळीवर खेळणार्‍या हरीश कुमारचे खेळण्यातील कसब 2011 मध्ये त्याचे प्रशिक्षक हेमराज यांनी हेरले. त्यांनी हरीश कुमारला स्पोर्टस् ऍथॉरिटी ऑफ इंडियाचा रस्ता दाखवला. त्यानंतर हरीशला सरकारी  मदत मिळावयास सुरुवात झाली.

आपली प्रतिक्रिया द्या