भाई वैद्य

289

 <<मेधा पालकर >>

स्वातंत्र्यसेनानी तसेच समाजवादी आणि प्रागतिक चळवळीचे एक मार्गदर्शक म्हणून आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे डॉ. भाई वैद्य यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक ‘चळवळीतील शिलेदार’ निघून गेला आहे. शाळकरी वयातच भाई वैद्य स्वातंत्र्यचळवळीकडे आकर्षित झाले. वेल्हा तालुक्यातील दापोडे हे त्यांचे मूळ गाव.  शालेय जीवनात त्यांनी १९४२ च्या चले जाव चळवळीमध्ये भाग घेतला. गोवा मुक्ती संग्रामात त्यांचा सहभाग राहिला. लोकनेते जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया आणि एस. एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे सदस्यत्व स्वीकारून त्यांचा राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या सर्व घडामोडींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना सातत्याने तुरुंगवास पत्करावा लागला. १९६१ मध्ये कच्छ येथे झालेल्या सत्याग्रहामध्ये भूज ते खावडा पदयात्रेमध्ये ते सहभागी झाले होते. शोषित, पीडित, कष्टकरी समाजासाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या भाई वैद्य यांनी पुणे महापालिकेची  निवडणूक लढविली. १९७४ मध्ये पुण्याच्या महापौरपदी त्यांची निवड झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला विरोध करणारे भाई वैद्य ‘मिसाबंदी’ म्हणून १९ महिने तुरुंगामध्ये होते. पुढे जनता पक्षाने जनसंघाबरोबर युती करून स्थापन केलेल्या पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) सरकारमध्ये भाई यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपदाची धुरा आली. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक मांडले. राज्यातील पोलिसांना फुल पॅण्ट देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच काळात घेतला गेला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान सेवा आणि निवृत्तीवेतन आणि त्याची महागाईशी जोडणी त्यांनी करून घेतली. त्यांनी समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय महामंत्रीपद भूषविले. एस. एम. जोशी मेमोरियल मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, समाजवादी अध्यापक जनसभेचे ते मार्गदर्शक होते. भाई यांचा समाजिक कार्य, राजकीय सहभाग असला तरी त्यांनी संपूर्ण कालखंडात विपुल लेखन केले. समाजवादी विचारधारेसंबंधी त्यांनी लेखन केले. ‘एका समाजवाद्याचे चिंतन’, ‘मंडल आयोग व अन्य मागासवर्ग’, ‘समाजवाद’, ‘संपूर्ण शिक्षणःफी विरहित समान व गुणवत्तापूर्ण का व कसे’, ‘आर्थिक आक्रमणाचे आरिष्ट’, ‘परिवर्तनाचे साथी व सारथी’, ‘शब्दांमागचे शब्द’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. गेल्या सात दशकामध्ये भाई वैद्य यांना पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे पुण्यभूषण पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, राष्ट्रीय बंधुता पुरस्कार, महर्षी पुरस्कार, नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार अशा प्रतिष्ठsच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. लोकशाही  समाजवाद ही विचारधारा त्यांनी अखेरपर्यंत जपली. स्वातंत्र्य, समता अणि सामाजिक न्याय अशा संवैधानिक मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. मोकाट अर्थव्यवस्थेच्या विरोधात कायम आवाज उठवत गोरगरीबांच्या हिताच्या अर्थकारणाचा आग्रह त्यांनी धरला. भाई वैद्य यांच्या जीवनकार्यावर दिग्दर्शक धनंजय भावलेकर यांनी पाच वर्षांपूर्वी ‘भाई वैद्य एक सामाजिक पर्व’ हा माहितीपट केला. जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली अशा चार हजार किलोमीटर अंतराच्या भारत यात्रेमध्ये भाई वैद्य यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. दिल्ली येथील भारत यात्रा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी भूषविले. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतल्याबद्दल अनेकदा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. स्वातंत्र्योत्तर काळातही विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मिळून त्यांनी २५ वेळा तुरुंगवास भोगला.  शिक्षण हक्काच्या मागणीसाठी डिसेंबर २०१६ मध्ये आंदोलन केल्याबद्दल वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांना अटक झाली होती. सत्ता असो अथवा नसो, पद असो वा नसो, पण तळागाळातील जनता, गोरगरीबांसाठी कायम धावून जाणे, त्यांच्यावर होणारा अन्याय कधी सहन न करणे हेच क्रत त्यांनी अंगिकारले. कायम न्यायाची बाजू ते घेत राहिले. लोकशाही मार्गाने ते प्रतिवाद करायचे, पण त्याचवेळी ते विरोधी बाजूही शांतपणे ऐकून घ्यायचे. वयाच्या नव्वदीतही त्यांचा उत्साह कायम होता. आज ते आपल्यात नसले तरी अन्यायाविरोधात लढण्याची त्यांची तडफ तरुणांना पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी राहील.

आपली प्रतिक्रिया द्या