वैद्यकीय अधिकाऱ्याकडून परिचारिकेचे लैंगिक शोषण, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सामना प्रतिनिधी, परभणी

जिंतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य येलदरी केंद्रांतर्गत उपकेंद्र पिंपळगाव (का) येथे कार्यरत असलेल्या एका परिचारिकेवर वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसीफ हुसेन अन्सारी यांनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार आज एका निवेदनाद्वारे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सदरील परिचारीकेने आपल्या तक्रारीत डॉ. तौसीफ अन्सारी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. तसेच या डॉक्टरविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही या परिचारीकेने केली आहे. आपल्या या तक्रार वजा निवेदनाच्या प्रती परभणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, आरोग्य उपसंचालक संभाजीनगर यांना पाठविल्या आहेत.

जिंतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी येथे मागील अडीच वर्षापासून सदर महिला परिचारिका म्हणून काम पाहते. येथे काम करत असताना डॉ. तौसीफ अन्सारी यांनी वेळोवेळी महिलेस अडवणूक करत शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला असून रात्री-बेरात्री कॉल करून बोलावून शारीरिक संबंधांची मागणी केली. सतत मागील 2 वर्षांपासून परिचारिकेचे लैंगिक शोषण झाले असून तिने नकार दिला असता, तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी डॉ. तौसीफ अन्सारी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.

पीडितेचा आत्महत्या करण्याचा होता मानस
डॉ. तौसीफ अन्सारी याच्या नेहमीच्या छळाला कंटाळून परिचारिका या फाशी घेणार होती. 3 जून 2019 रोजी या परिचारिकेची रात्रपाळी होती. दुसऱ्या दिवशी सुटीचा वार होता. दुपारी बोलावून घेऊन डॉ. तौसीफ अन्सारीने ‘आता मला तुझी गरज नाही, माझे लग्न झालेले आहे. तू आता क्वॉटर खाली कर, असे म्हणत मुख्यालय सोडण्याचे आदेश दिले. ते आदेश हातात घेऊन परिचारिका रडू लागली. तातडीने परिचारिकेने क्वॉटरमध्ये जाऊन फाशी घेण्यासाठी छताला दोर बांधत होती. याचवेळी काही लोकांनी तिला पाहिले. तिचा सोबत असलेला 4 वर्षांचा मुलगा यावेळी रडू लागला. पर्यवेक्षक कऱ्हाळे यांनी तातडीने तिला फाशी घेण्यापासून परावृत्त केले. या प्रकारानंतर अन्सारी यांनी नौकरीवरून काढून टाकण्याची व पुढची आर्डर मिळू देणार सतत धमकी दिली. ‘तु कुठेही जा, माझे काहीही होत नाही.’ असेही बजावले.