आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले सीईटीचे विद्यार्थी श्रीमंत असल्याचा संशय, उत्पन्नाचे दाखले पुन्हा तपासणार

1742

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतलेल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) विद्यार्थ्यांनी खोटी कागदपत्रे दाखवल्याची तक्रार दाखल झाली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत नसतानाही ईडब्ल्युएस कोट्यातून प्रवेश मिळवल्याच्या अनेक तक्रारी सीईटी विभागाकडे करण्यात आल्याचं वृत्त आहे. अशा प्रकारे प्रवेश मिळवणाऱ्या 27 विद्यार्थ्यांची यादी विभागाने काढली असून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, 2020-21 या वर्षाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी प्रथमच ईडब्ल्युएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राखीव कोटा ठेवण्यात आला होता. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांहून कमी आहे, अशांना या राखीव कोट्यातून प्रवेश देण्यात आला.

मात्र, या कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इतर अनेक विद्यार्थ्यांनी यातील काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचा दावा केला होता. तशा तक्रारीही विभागाकडे दाखल झाल्या होत्या. संशयित विद्यार्थ्यांची सोशल मीडिया अकाउंटही या दाव्यांना समर्थन करत असल्याचं चित्र होतं. कारण, या विद्यार्थ्यांनी उत्पन्न कमी असल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर परदेशवाऱ्या आणि तत्सम अनेक फोटो मात्र वेगळं सांगत होते.

तक्रारींची गंभीर दखल घेत सीईटी विभागाने 27 विद्यार्थ्यांची यादी केली आहे. या यादीत मुंबईसह महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी दिलेली कागदपत्रे विशेषतः उत्पन्नाच्या पुराव्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. तूर्तास त्यांचे प्रवेश आहे त्या स्थिती ठेवण्यात येणार असून दोषी आढळल्यास या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सीईटी विभागातर्फे देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या