आदिवासी पाड्यांवरील आरोग्य सेवकांच्या मदतीसाठी एसएनएफ सरसावले, 10 हजार जणांना वैद्यकीय सुरक्षा साहित्य देणार

गेली अनेक वर्षे ग्रामीण, अतिदुर्गम आदिवासी भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून कार्यरत असलेले नाशिकचे सोशल नेटवर्किंग फोरम वर्षभरापासून खेड्यापाड्यांवर आरोग्य सुविधा, अन्नधान्य पुरवत आहे. आता त्यांनी ग्रामस्थांची काळजी घेणाऱ्या आरोग्य सेवकांना वैद्यकीय सुरक्षा साहित्य देण्यासाठी पुढाकार घेतला असून, आदिवासी तालुक्यांमधील शेकडो आशा वर्कर्स, मदतनीस आणि कोविड सेंटर्सवरील कर्मचाऱ्यांपर्यंत अत्यावश्यक साहित्य पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे.

कोणत्याही संकटात लोकांना मनापासून हाक द्या, शेकडो हात सहकार्यासाठी पुढे येतात हा अनुभव एसएनएफ टीम घेत आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील दहा हजार आरोग्य सेवकांना वैद्यकीय सूरक्षा साहित्य पुरवण्याचा निर्णय एसएनएफने घेतला आहे. मदतीसाठी केलेल्या आवाहनाला देश-विदेशातून प्रतिसाद मिळाला आहे. आनंदाची बाब म्हणजे सामाजिक संस्था आणि कंपन्यांनीही यात योगदान देण्यास सुरुवात केली आहे.

नाशिकची प्रसिद्ध शैक्षणिक संस्था रचना ट्रस्ट आणि जेनीक्स इंजिनियरींग यांनी सुरक्षा साहित्यासाठी चार लाख रुपयांची मदत केली. रचना ट्रस्टचे सदस्य डॉ. आर्चीस नेर्लीकर, डॉ. हेमंत कोतवाल, सीईओ नरेंद्र बर्वे, जेनीक्स इंजिनियरींगचे निखील दिवाकर यांनी या कामाला मोठे बळ दिले. या निधीतून जवळपास 3000 आरोग्य सेवकांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलता येणार असून, त्यातून फेस शिल्डस, मास्क, सॅनिटायझर, वेपरायझर्स, पीपीई किट्स आणि इतर आवश्यक साहित्य पुरवण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या हे साहित्य पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यातील आशा वर्कर्स, मदतनीस आणि कोविड सेंटर्सवरील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या नियोजनासाठी अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह डॉ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, संदीप बत्तासे, जयदीप गायकवाड, डॉ. निलेश पाटील, विजय भरसट, संदीप डगळे, रामदास दिवे आणि टिम अहोरात्र काम करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या