ललिता साळवेंच्या शरीरात महिलेचे एकही लक्षण नाही डॉक्टरांचा खुलासा

सामना ऑनलाईन, मुंबई

बीड पोलीस दलात कार्यरत असलेल्या ललिता साळवे यांनी लिंगबदलाची मागणी केल्यानं फक्त पोलीस दलातच नाही तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. साळवे यांच्या सोमवारी वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. जवळपास १२ तास चाललेल्या या चाचण्यांमधून जो निष्कर्ष समोर आला तो बघून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. ललिता यांच्या शरीरात महिलांच्या शरीरातील महत्वाचे भाग आढळून आलेले नाहीत. यामध्ये गर्भाशय, गर्भनलिका, वक्ष, महिलांचे गुप्तांग याचा समावेश आहे. जवळपास २९ वर्ष महिला म्हणून जगत असलेल्या ललिता साळवे या शारिरीकदृष्ट्याही पुरुषांप्रमाणे असल्याचं या चाचण्यांमधून स्पष्ट झालं आहे. घरच्यांनी लग्नासाठी पाठपुरावा करायला सुरुवात केल्यानंतर ललिता यांनी लिंगबदलाचा निर्णय घेतला होता, त्यांच्या या निर्णयाला घरातल्यांप्रमाणेच गावातल्या लोकांनीही पाठिंबा दिला आहे.

मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसारसाळवे यांची ८ डॉक्टरांनी तपासणी केली यामध्ये स्त्रीरोगतज्ञ, रेडियोलॉजिस्ट,प्लॅस्टीक सर्जन, शस्त्रक्रिया विभागाचे डॉक्टर, मानसोपचारतज्ञ, सामान्य चिकीत्सक, युरोलॉजिस्ट यांचा समावेश होता. या चाचण्यांदरम्यान डॉक्टरांना कळालं की पुरूषांप्रमाणे ललिता यांनाही वृषण होतं ज्यातील एक वृषण १९९५ साली एका शस्त्रक्रियेदरम्यान  काढून टाकण्यात आलं होतं. त्यावेळी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना ट्युमर असावा अशी शक्यता वाटल्याने हे वृषण काढून टाकण्यात आलं होतं. ललिता यांची तपासणी करणाऱ्या १२ डॉक्टरांनी त्यांचा अहवाल तयार केला असून राज्याच्या गृहविभागाला तो पाठवण्यात आला आहे. आम्हाला परवानगी मिळताच आम्ही ललिता यांच्यावर लिंगबदलाची शस्त्रक्रिया करू असं या डॉक्टरांनी सांगितले आहे.