औषधी थंडी…

181

<< डॉ. देवेंद्र रासकर >>

थंडी गुलाबी असते… कडाक्याची असते… तशी औषधीही असते… अगदी आरोग्यदायी!

थंडी… गोड गोड थंडी… गुडूप झोपून राहावं असं वाटणारी बोचरी थंडी… सकाळी उठून कोण व्यायाम करणार? तोंडावरून चादरही काढावीशी वाटत नाही अशी ही थंडी असते… पण थंडीच्या या दिवसांमध्ये औषधी गुणधर्मही भरपूर असतात याची आपल्याला फारशी कल्पना नसते. होतं काय, या दिवसात सर्वजण व्यायामाकडे वळतात. पण निसर्गाकडे जेवढे जाल तेवढा फायदा होतो. प्रदूषण सोडून निसर्गात जाणं केव्हाही चांगलं. प्रदूषण आता सगळ्याच ऋतूंमध्ये असते. पण थंडीच्या ऋतूमधली हवा चांगली असल्याने शहरापासून थोडं दूर खेडय़ापाडय़ांत गेलं पाहिजे. तिथली शुद्ध आणि छान हवा आरोग्यासाठी फायद्याची असते.

व्यायाम करायचा, पण निसर्गाच्या साथीने तो करायचा… डोंगर चढणं असेल किंवा गवतावरून चालणं असेल हे केले तर या थंडीचा चांगला उपयोग करून घेता येतो. या दिवसांत पचनसंस्था चांगली राहाते. त्यामुळे अशा प्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात राहून भरपूर व्यायाम केलात तर यात रिझल्ट चांगले मिळतात. आरोग्यासाठी थंडीचे दिवस नेहमीच फायद्याचे असतात. घाम कमी येत असल्याने सकाळची हवा आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगली… या ऋतूमध्ये व्यायाम केलेला किंवा निसर्गात फिरायला जाणं योग्य ठरतं.

थंडीचे दिवस म्हटले की पहाटे दवबिंदू दिसतात. हे दवबिंदूही खूपच औषधी असतात. या दवबिंदूंवरून सकाळच्या वेळी चाललात तर शरीरातील उष्णता, गरमी कमी होते. दवबिंदू असलेल्या गवतावरून चालले तर रक्ताभिसरणही चांगले होते. हेही औषधी फायदे थंडीचे माणसाला मिळू शकतात.

थंडीच्या दिवसांत निसर्गामध्येही खूप घडामोडी होत असतात. थंडीतल्या झाडांना येणारी पाने-फुले हीदेखील औषधी गुणधर्म असलेली येतात. त्यानंतर येणाऱया वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते…

दवबिंदू साठवणं कठीण…

दवबिंदूंवरून चालल्याने आरोग्यासाठी खूप फायदा होत असला तरी हे दवबिंदू साठवता येणं खूप कठीण असते. तशा प्रकारची व्यवस्था निसर्गानेच ठेवलेली नाही. कारण पहाटे चार वाजल्यापासून सकाळी साडेसात आठपर्यंत दव पाहायला मिळते. नंतर ते उन्हाच्या उष्णतेने विरघळून जाते. हे दवबिंदू कोणत्या माध्यमातून साठवणार हा मोठा प्रश्न असतो. शरीराला मिळालेली ऊर्जा तुम्ही साठवून ठेवू शकता, पण दवबिंदू साठवता येत नाहीत. पहाटेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंतची हवादेखील आरोग्यासाठी खूप चांगली असते.

आजारपण कमी होते

थंडीच्या दिवसांत गरम आणि थंड अशा दोन्ही पाण्यांनी आलटूनपालटून आंघोळ केली तरीदेखील शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दवबिंदूंचा फायदा करून घेता आला पाहिजे. पायाच्या तळव्यांना या दवाचा खूप चांगला औषधी उपयोग होतो. केवळ दवबिंदूंवर चालल्यामुळे तळव्यांद्वारे अख्ख्या शरीराचे रक्ताभिसरण चांगले ठेवता येते. शरीरातील सेल्स दवबिंदूंच्या स्पर्शाने ऑक्टिव्ह होत असतात. त्यामुळे आपल्याला होणारे सर्वसाधारण आजार किंवा ज्यांना व्हायरल आजार म्हणता येतात ते टाळता येऊ शकतात. या आजारांचं प्रमाण कमी होते. त्यामुळे हिवाळ्यात शक्यतो दवबिंदूंवरून चालण्याचा व्यायाम हमखास करायलाच पाहिजे. पहाटेच्या सुमारास डोंगर किंवा टेकडीवर फिरायला गेलात तर तेथे दवबिंदूंवरून मनसोक्त चालता येऊ शकेल. त्यांचा शरीराला खूप चांगला फायदा होतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या