
कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून काही कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच भाग म्हणून आता कल्याण-डोंबिवलीतील मेडिकल स्टोअर्समध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय तापाची एक गोळीसुद्धा मिळणार नाही. जर दुकानदारांनी हा नियम पाळला नाही तर थेट औषध दुकानाचा परवाना रद्द करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून कल्याणडोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. गेले दोन महिने रोज पाच – दहा कोरोना रुग्ण आढळत असताना आता हीच रोजची संख्या 150 च्या घरात गेली आहे. यामुळे या साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकात मेल, एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या प्रवाशांची अँटीजन टेस्ट केली जात आहे. शिवाय प्रभाग निहाय आरोग्य सर्वेक्षण सुरू आहे. तसेच खासगी दवाखान्यात येणाऱ्या ताप रुग्णांची तातडीने कोविड चाचणी करण्याबाबत डॉक्टरना सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही बरेच रुग्ण हे ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल स्टोअसमधून औषधे घेत असल्याचे प्रकार काही ठिकाणी घडत आहेत.
हा हलगर्जीपणा कोरोनाला निमंत्रण देणारा असल्याने पालिकेने याबाबत कठोर भूमिका घेतली. हा प्रकार एफडीएला कळवला. यानुसार कोणत्याही रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देण्यात येऊ नये अन्यथा दुकान परवाना रद्द करण्याचा इशारा सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिला आहे.