ठाण्याच्या महापौरांची आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड

35

सामना ऑनलाईन, ठाणे

ठाणे महापालिकेच्या निवडणूक स्पष्ट बहुमत मिळवत सत्तेत विराजमान झालेल्या शिवसेनेच्या महापौर आणि उपमहापौरांची आज बिनविरोध निवड झाली. महापौरपदी मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी विराजमान झाले आहेत. हा विजय मिळवून देणाऱ्या शिवसैनिकांचे कौतुक करण्यासाठी आणि ठाणेकरांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: ठाण्यामध्ये आले होते.

uddhav-thacekray-in-thane-m

ठाणेकर सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आहेत. शिवसेनेनेही विकासकामांच्या जोरावर ठाणेकरांचा विश्वास सार्थ करून दाखवला आहे. आज महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीपूर्वी संपूर्ण ठाण्यात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे ठाण्यामध्ये भगवी लाटच आली आहे असं वाटत होतं. महापालिकेचा परिसरही फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हत्ती उभे करण्यात आले होते तसेच महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता.  महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड होताच शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला होता. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाणे महापालिकेच्या आवारात दाखल होताच या शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा द्यायला सुरूवात केली, त्यावेळी तिथे निर्माण झालेले वातावरण हे अभूतपूर्व असे होते.

shivaji-maharaj-statue

महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली होती. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरांची निवड ही औपचारीकता उरली होती. उद्धव ठाकरे यांनी या दोघांचे अभिनंदन केलं. मीनाक्षी शिंदे घोडबंदर परिसरातील मानपाडा भागातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी यापूर्वी माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष पद तसेच स्थायी समितीचे सदस्यपद भूषविले आहे

 

 

आपली प्रतिक्रिया द्या