‘बेस्ट’ला सावरण्यासाठी आज गटनेत्यांची बैठक

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेस्टला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याबाबत उद्या शनिवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक होणार आहे. बेस्टची परिस्थिती कायमस्वरूपी सुधारावी यासाठी एक कृती आराखडा अलीकडेच झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. या आराखड्याला पालिकेने मंजुरी दिल्यानंतर बेस्ट समितीत हा आराखडा सादर करण्यात येणार आहे.

बेस्टच्या आर्थिक परिस्थितीबाबत आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच अर्थसंकल्पात बेस्टसाठी काही तरतूद करायला हवी होती असे मत सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केले. जगभरात कोणताही परिवहन उपक्रम फायद्यात चालत नाही. तरीही बेस्ट उपक्रमाने फायदा कमवला पाहिजे असा हट्ट पालिका आयुक्त करत आहेत. त्यांचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे असा हरकतीचा मुद्दा भाजप नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी मांडला. शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांनी पालिका शिक्षण, आरोग्य यांसाठी जशी निधीची तरतूद करते तशीच तरतूद बेस्टसाठीही करावी अशी मागणी केली. अतुल शाह आणि सरिता पाटील यांनीही अर्थसंकल्पात बेस्टसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली. काँग्रेसचे रवी राजा यांनी बेस्टने ठोस कृती आराखडा सादर करावा अशी मागणी केली. यावर महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी कृती आराखडा गटनेत्यांच्या बैठकीत सादर केला असून याला पालिकेने मंजुरी दिल्यानंतर तो बेस्ट समितीत सादर केला जाईल असे सांगितले.

बेस्ट जगली पाहिजे
बेस्ट ही मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ती जगली पाहिजे. बेस्टची स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य कायम ठेवून पालिका आणि बेस्टचा अर्थसंकल्प एकत्रित करावा अशी शिवसेनेची भूमिका आहे.
– यशवंत जाधव (सभागृह नेता)

तोडगा निघेल
बेस्टला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्त, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष सकारात्मक आहेत. बेस्टची परिस्थिती सुधारण्याबाबत उद्या गटनेत्यांची बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
– अनिल कोकीळ (बेस्ट समिती अध्यक्ष)

आपली प्रतिक्रिया द्या