नगर शहर विकासासाठी आयुक्तांनी घेतली बैठक

18

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरामध्ये महानगपालिकेच्या माध्यमातून कायम स्वरुपी उपाय योजना करण्याच्या दृष्टीकोणातून शहरातील विविध उद्योजकांची तसेच सामाजिक संस्थांचे योजगदान घेऊन शहरात काही उपाय योजना होऊ शकतील का? असा उद्देश समोर ठेऊन महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संस्था, कंपन्या, तसेच सामाजिक प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांची मुहर्तमेढ रोहवली आहे. बैठकीत आराखडा तयार करण्याच्या संदर्भातील चर्चा करण्यात आली असून त्यासाठी समिती गठीत करण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

विविध उपक्रम विविध संस्थांच्या सहभागातून राबविण्यासाठी महापालिका शहरातील कंपन्या, संस्था, बँकांचा सहभाग घेणार आहे. बुधवारी (दि.15) या संदर्भात बैठकही पार पडली. यावेळी उपायुक्त सुनील पवार, शहर अभियंता विलास सोनटक्के, अभियंता कल्याण बल्लाळ, राजेंद्र मेहेत्रे, आर्किटेक्ट असोसिएशनचे अशोक सातकर, ‘एल ऍण्ड टी’चे ईश्‍वर हांडे, शेखर देशमुख, क्रेडाईचे अमित मुथा, राहुल पितळे, सलीम शेख आदींसह महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, ऍक्सिस बँक, बंधन बँक आदी बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्त भालसिंग यांनी उपक्रमांबाबत संकल्पना मांडली. महापालिकेच्या शाळांचे अद्ययावतीकरण, वर्ग खोल्यांची उभारणी, दुरुस्ती, उद्यान विकसित करणे, शहरातील पर्यटन स्थळांच्या माहितीचे फलक लावणे, कॉफी टेबल बुक तयार करणे, सीनानदी सुशोभिकरण, छोटे कंपोस्टिंग प्लँट, मनपा रुग्णालयांमध्ये आवश्यक साहित्य, उपकरणे पुरविणे आदींसह इतर काही उपक्रमांसाठी संस्था, बँका, कंपन्यांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थितांच्या संकल्पना व सूचनाही त्यांनी मागविल्या.

महापालिकेने अपेक्षित उपक्रमांसंदर्भात बुकलेट तयार करावे. किती चौकांचे सुशोभिकरण करायचे, मनपाला कुठे व कोणते साहित्य अपेक्षित आहे, रुग्णालये, शाळांमध्ये काय-काय सुविधा, उपकरणे आवश्यक आहेत याची माहिती व त्यासाठी आवश्यक खर्च याची माहिती एकत्रित करुन जाहीर करावी. विविध संस्था या उपक्रमांसाठी पुढाकार घेतील अशी सूचना अशोक सातकर यांनी मांडली. इतर उपस्थितांनीही याबाबत सूचना मांडल्या. या संदर्भात महापालिकेकडून आराखडा तयार करण्यात येईल, त्यासाठी मनपा व संस्थांचे प्रतिनिधी अशी समिती तयार करण्यात येईल, असे आयुक्त भालसिंग यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ही प्राथमिक बैठक असून या संदर्भात लवकरच आणखी एक बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या