या बेफाम वाहतुकीला आता शिस्त लावा हो…!

प्रातिनिधीक फोटो
सामना प्रतिनिधी , संभाजीनगर

कुणी सिग्नल तोडून सुसाट निघतोय… कुणी तर्रर नशेत रस्ताभर धुमाकूळ घालत वाहतुकीला वेठीस धरतो … तर कोणी राँग साईड भरधाव येऊन अनेकांना हुलकावण्या देतो… या बेफाम वाहतुकीला आता शिस्त लावा हो… असा आर्त टाहो फोडत सर्वसामान्यांनी वाहतूक शाखेसमोर अनेक व्यथा मांडल्या. आज बुधवारी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी वाहतुकीच्या अनेक समस्या आणि शहरातील सर्वच रस्त्यांवर होत असलेल्या पाार्किगसंदर्भातील गंभीर तक्रारींचा पाऊस पडला. पोलिसांनी परिस्थिती पाहता आम्ही पोलीस आयुक्तांशी चर्चा करू आणि वाहतूक समस्येवर मार्ग काढू, असे म्हणत वेळ मारून नेली.

बीड बायपास रस्त्यावरील वाहतुकीसंदर्भातील समस्यांवर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक भरत काकडे, कैलास प्रजापती, अशोक मुदीराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीस देवळाई, सातारा परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली. त्यांना दररोज वाहतुकीला कसे समोरे जावे लागते, याचा पाढा वाचत त्यावर मार्ग काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा सूर सर्वसामान्यांचा होता. या रस्त्यावरून भरधाव जड वाहने चालवली जातात. त्या वाहनांचा वेग मर्यादित असतानादेखील त्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्यामुळे स्पीड गनमार्पकत प्रत्येक वाहनांचा वेग तपासून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रामुख्याने समोर आली. त्यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे – घाडगे यांनी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड गन या बायपास रस्त्यावर बसविण्यात आली होती. त्यावेळी बऱ्यापैकी यावर नियंत्रण मिळाले. मात्र, ती गन काढल्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली असल्याचे दिसून येत असल्यामुळे आगामी काळात या रस्त्यावर स्पीड गन बसविण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन नागरिकांना यावेळी देण्यात आले.

बीड बायपास रोडवर स्पीडब्रेकर बसविण्यात यावे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे काढण्यात यावे, राँग साईडने येणारे वाहनचालक, रस्त्यावर लेन माा\कग करावी, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, सव्र्हिस रोडचे काम तातडीने हाती घ्यावे आणि त्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात यावे यासह इतर तक्रारींचा पाढा नागरिकांनी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे- घाडगे यांच्यासमोर वाचला. या तक्रारींची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन बैठकीच्या शेवटी पोलीस उपायुक्तांनी नागरिकांना दिले.

वांझोटी चर्चा

पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे – घाडगे या वाहतूक समस्येवर तातडीने तोडगा काढतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, त्यातून काही निष्पन्न झाले नसल्यामुळे केवळ वांझोटी चर्चा करून त्या निघून गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.