नारेगाव, मिटमिटा ग्रामस्थांसोबत आज बैठक

31

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कचराडेपो सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. नारेगावच्या आंदोलकांशी व मिटमिट्यातील ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढण्याकरिता उद्या १ मार्च रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी दिली.

नारेगाव कचराडेपोच्या विरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे तेरा दिवसांपासून शहराची कचराकोंडी झाली आहे. मनपा प्रशासनाने पैठण रोडवरील बाभुळगाव आणि वाळूज येथे खासगी कंपनीच्या माध्यमातून कचराडेपो थाटण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील लोकांनीही कचराडेपोला विरोध दर्शविला. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनाने संयुक्तपणे मिटमिटा, आडगाव, तीसगाव आदी भागांतही पाहणी केली. तिथेदेखील लोकांनी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले. मात्र तेरा दिवसांपासून आंदोलनकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे सध्या शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयाने बुधवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुवत यांना सोमवारपर्यंत तोडगा काढण्यात यावा, असे निर्देश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा पुन्हा कामाला लागली आहे. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी कचरा कोंडीवर मार्ग काढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात उद्या १ मार्च रोजी नारेगाव येथील आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी सकाळी १०.३० वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. तर मिटमिट्यातील ग्रामस्थांना दुपारी २ वाजता बोलवण्यात आले आहे. मनपा प्रशासनाकडून ग्रामस्थांना पत्र देण्यात आले असून, त्यांच्यासोबत कायदेतज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. नारेगाव आणि मिटमिटा येथे सफारी पार्क च्या जागेवर कचरा टाकण्यासंदर्भात चर्चा केली जाईल.

नारेगावात प्रसादाचे जेवण

कचराडेपो हटविण्यासाठी नारेगावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनाचा आज तेरावा दिवस असल्यामुळे कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी मनपा प्रशासनाचा तेरावा घालत निषेध केला. विनोदाचार्य साठे महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या