मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या वतीने रविवार (6 ऑक्टोबर 2024) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यानुसार मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर पनवेल वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.34 ते दुपारी 03.03 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील तसेच त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 03.40 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील तसेच त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक (बेलापूर-उरण आणि नेरुळ-उरण बंदर मार्ग वगळता) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या वेळेत पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 03.20 या वेळेत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
डाऊन हार्बर मार्गावर
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.16 वाजता सुटेल आणि सायंकाळी 4.36 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
अप हार्बर मार्गावर
ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.17 वाजता सुटेल आणि सकाळी 11.36 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी 04.10 वाजता सुटेल आणि सायंकाळी 05.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर
ब्लॉकपूर्वी पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 10.31 वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलकडे दिशेने जाणारी पहिली लोकल सायंकाळी 4.00 वाजता ठाणे येथून सुटेल आणि सायंकाळी 4.52 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
अप ट्रान्स हार्बर मार्गावर
ब्लॉकपूर्वी ठाण्याकडे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.41 वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी 11.33 वाजता पोहोचेल. पनवेल येथून ब्लॉकनंतर ठाणे येथे जाणारी पहिली लोकल सायंकाळी 04.26 वाजता असेल आणि ठाणे येथे सायंकाळी 05.20 वाजता पोहोचेल.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी मार्गावर विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.