पंतप्रधानांच्या हातात तपास यंत्रणा; करा माझी बिनधास्त चौकशी! सत्यपाल मलिक यांचे आव्हान

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे. शेतकऱ्यांची बाजू घेऊन मी बेधडक बोलतच राहणार. तुम्हाला काय करायचे ते करा. मोदींच्या हातात सर्व तपास यंत्रणा आहेत. करा माझी बिनधास्त चौकशी, असे मलिक ‘बिनधास्त’पणे म्हणाले आहेत.

झूनझून येथे 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या सत्कारसोहळय़ाचा हा व्हिडीओ आहे. मेघालयात ‘बदली’ होण्यापूर्वी मलिक हे जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते. तेथील अनुभव सांगताना ते म्हणाले, कश्मीरसारखे भ्रष्ट राज्य दुसरे कुठलेही नाही. इतर राज्यांत ‘स्वाक्षरी’ करण्यासाठी पाच टक्के कमिशन मागितले जाते, तर कश्मीरात हा दर 15 टक्के एवढा आहे. पण माझी एवढी दहशत होती की, कश्मीरात भ्रष्टाचाराला मी वावच ठेवला नाही, असा दावाही मलिक यांनी केला.

…तर ईडी-आयटीवाले आले असते

कश्मीरातून मेघालयात आल्यानंतर मी शेतकऱ्यांच्या बाजूने बेधडक बोलू लागलो. जर मी कश्मीरात भ्रष्टाचार केला असता तर शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो म्हणून ईडी आणि आयकर खाते माझ्या घरी पोहचले असते, असेही मलिक म्हणाले. मलिक यांच्या या बेधडक वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आता मोदी सरकारच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होऊ लागला आहे.