… तोपर्यंत कोणतीही निवडणूक लढणार नाही, मेहबुबा मुफ्ती यांची घोषणा

फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर आता जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही कश्मीर खोऱ्यात कलम 370 पुन्हा लागू करण्याची शपथ खाल्ली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार आमचा हक्क (कलम 370) आम्हाला देत नाही तोपर्यंत निवडणूक लढण्यात आपल्याला रुची नसल्याचे मेहबुबा यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींना कलम 370 चा सहारा घ्यावा लागत आहे. अन्य बाबतीत ते अपयशी ठरतात तेव्हा ते कश्मीर आणि कलम 370 सारख्या मुद्द्यांवर बोलतात आणि वास्तवातील मुद्दे टाळतात, अशी टीका मेहबुबा मुफ्ती यांनी केली.

जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईपर्यंत माझा संघर्ष सुरु राहील. माझा संघर्ष कश्मीर समस्येच्या समाधानासाठी सुरू असेल, असेही मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

चीनने कब्जा केल्याचा आरोप

चीनने लडाखमध्ये हिंदुस्थानच्या 1000 वर्ग किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे, असा आरोप मेहबुबा यांनी केला. तसेच कलम 370 हटवण्यास व लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे, असेही त्या म्हणाल्या.

434 दिवसानंतर सुटका

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यापूर्वी मेहबुबा मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आले होते. तब्बल 434 दिवसानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 370 लागू करण्यासाठी मोहीम छेडली आहे.

अब्दुल्ला यांनी ओकली गरळ

जम्मू-कश्मीरचे लोक स्वतःला हिंदुस्थानी समजत नाहीत आणि हिंदुस्थानी नागरिक होण्याची त्यांची इच्छाही नाही. उलट चीनने कश्मीरवर राज्य करावे अशी येथील जनतेची मनापासूनची इच्छा असल्याचे गरळ माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी ओकली. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या