तिरंग्याचा अपमान करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांना पक्षांतर्गत विरोध, 3 नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) च्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांना तिरंग्याचा अपमान करणे महागात पडले आहे. मेहबुबा यांना पक्षांतर्गत विरोध वाढत असून3 नेत्यांनी सोमवारी राजीनामा दिला. टी.एस. बाजवा, वेद महाजन आणि हुसैन ए वफा यांनी मेहबुबा यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली असून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी गेल्या काही दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी मोहीम उघडली आहे. यासाठी अखेरपर्यंत संघर्ष सुरू राहील असे त्यांनी म्हटले होते. तसेच जोपर्यंत कलम 370 पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत तिरंगा हाती घेणार नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. यामुळे खोऱ्यात मोठा गोंधळ उडाला होता. भाजपने याला जोरदार विरोध केला होता.

नेत्यांचे पत्र

टी.एस. बाजवा, वेद महाजन आणि हुसैन ए वफा यांनी मेहबुबा यांना पाठवलेल्या पत्रात आपली नाराजी व्यक्त केली आहे. देशभक्तीच्या भावनांचा अनादर केल्याने आम्ही अस्वस्थ झालो असून आता पक्षात राहून काम करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे.

भाजपचा विरोध

मेहबुबा मुफ्ती यांच्या विधानाला भाजपने विरोध केला असून सोमवारी पीडीपी कार्यालयावर तिरंगा फडकावून आपला विरोध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते जमा झाले होते, व घोषणाबाजीही करण्यात आली.

तिघांना अटक

तसेच जम्मू-कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये लाल चौकात क्लॉक टॉवरवर चढून तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा देण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या